कोल्हापूर : दिवाळीत शहरातील गल्लोगल्लींत झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे कोल्हापूरच्या हवेची तब्येत आणखीनच बिघडली आहे. फटाक्यांमधून निघालेल्या विषाक्त धुरामुळे हवा ‘ऑरेंज’ या खराब श्रेणीत गेली आहे. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा व भाऊबीजेला शिवाजी विद्यापीठ परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 150 वरून थेट 243 पर्यंत उसळला होता, असे उघड झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, लक्ष्मीपूजनदिवशी (1 नोव्हेंबर) कोल्हापूरची हवा मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली या शहरांपेक्षा अधिक प्रदूषित होती. हवा प्रदूषणाची ही गंभीर स्थिती असून, आता वेळीच सावध होण्याची गरज आहे. हवा प्रदूषणाने गंभीर रूप धारण केले आहे. परिणामी, कोल्हापूर शहराचा समावेश देशातील सर्वाधिक 130 प्रदूषित शहरांच्या यादीत झाला आहे.
‘सीपीसीबी’च्या एका अहवालानुसार, 1 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील सरासरी एक्यूआय 184 इतका होता. याच दिवशी मुंबईचा सरासरी एक्यूआय 169 इतका होता. तर, पुणे 114, सांगली 95 व सोलापूर 98 इतका होता. 2 नोव्हेंबर रोजी सर्वाधिक प्रदूषण पुणे व मुंबई येथे होते. 3 नोव्हेंबरला मुंबई व कोल्हापुरात अधिक प्रदूषण होते. पुन्हा 4 नोव्हेंबरला मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर या शहरांपेक्षा अधिक हवा प्रदूषण कोल्हापुरात होते. हा दोन केंद्रांवरील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक आहे. शहरातील एका केंद्रावर हवेची गुणवत्ता 243 पर्यंत गेली होती.
कोल्हापूरची हवा दिवसागणीक ढासळत चालली आहे. दिवाळी झाल्यानंतरदेखील कोल्हापूर शहर मुंबई, पुणे, सांगली, सोलापूरपेक्षा प्रदूषित आहे. बुधवारी (दि. 6) कोल्हापूरचा एक्यूआय 192 इतका होता; तर मुंबईचा एक्यूआय 158, पुणे 140, सांगली 119, सोलापूर 125 इतका होता.