कोल्हापूर : वळिवडे येथील संग्रहालयासाठी पोलंडच्या संसदीय शिष्टमंडळाने विविध वस्तू संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापौर रूपाराणी निकम, जि.प. सीईओ डॉ. जॅसमिन, संयोगीताराजे, शहाजीराजे, कर्नल संजीव बाजपेयी व विजयसिंह गायकवाड आदी उपस्थित होते.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

kolhapur | कोल्हापूरकरांचे प्रेम ८० वर्षांनंतरही कायम; पोलंडच्या संसदीय शिष्टमंडळाच्या भावना

वळिवडेतील संग्रहालयासाठी वस्तू सुपूर्द

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : तब्बल ८० वर्षांनंतरही कोल्हापूरचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा कायम आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या संकटकाळात आमच्या पूर्वजांना निर्वासित म्हणून नव्हे, तर पाहुण्यांप्रमाणे सन्मान देत आत्मीयतेने सांभाळले. यामुळे आजही आम्हाला आमच्या दुसऱ्या घरात आल्याचीच भावना होत आहे, अशा शब्दांत पोलंडच्या संसदीय शिष्टमंडळाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

पोलंडच्या शिष्टमंडळाने शनिवारी कोल्हापूरला भेट दिली. यात पोलंड-भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा किंगा गायेव्स्का, मुंबई येथील पोलंडचे वाणिज्यदूत तोमास्झ विएलगोमास, नवी दिल्ली येथील पोलिश इन्स्टिट्यूटच्या संचालक व मंत्री मालगोर्झाता वायसिस-गोवेंवियाक आदींचा समावेश होता. सायंकाळी भारत-पोलंड चिरंतन मैत्रीचा सुगंध या स्मरण समारंभात शिष्टमंडळाने ऐतिहासिक वस्तू व दस्तऐवज संग्रहालयासाठी संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केल्या. तत्पूर्वी शिष्टमंडळाचे स्वागत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापौर रूपाराणी निकम, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केले. यावेळी १०९ टी.ए. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संजीव बाजपेयी, कर्नल विजयसिंह गायकवाड, संयोगीताराजे, शहाजीराजे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. संग्रहालयाची माहिती डॉ. शिखा जैन व वरुण भांबरे यांनी दिली. सूत्रसंचालन राज निंबाळकर यांनी केले. वळिवडेच्या अपेक्षा निरंजन हिने आभार मानले.

विविध ठिकाणांना भेटी

शिष्टमंडळाने नवीन राजवाडा येथे छत्रपती परिवाराची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार शाहू महाराज, याज्ञसेनी महाराणी, मधुरिमाराजे, यशराजराजे आदी उपस्थित होते. यानंतर जुना राजवाडा, तुळजाभवानी व अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. जुन्या पुणे-बंगळूर रोडवरील तत्कालीन पोलंड नागरिकांच्या दफनभूमी आणि महावीर उद्यानातील पोलिश स्मृतिस्तंभास भेट देऊन अभिवादन केले. यानंतर वळिवडे येथील पोलिश संग्रहालयास भेट दिली.

मानवजातीसाठी प्रेरणादायी इतिहास : संभाजीराजे

वळिवडेचा इतिहास हा केवळ कोल्हापूर किंवा पोलंडचा नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. वळिवडे येथे उभारणारे जागतिक दर्जाचे संग्रहालय मानवता, शांतता आणि मैत्रीचे ठरेल, असा विश्वास संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT