अनुराधा कदम
कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पल महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलात्मक परंपरेची शान आहे. गेल्या काही वर्षांत या पारंपरिक चप्पलने स्थानिक बाजारातच नव्हे, तर जागतिक फॅशन क्षेत्रातही आपला ठसा उमटवत ब्रॅंड तयार केला आहे. कोल्हापुरातील कुशल कारागिरांच्या हस्तकलेचा हा ठसा आज अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचला आहे. गेल्या महिनाभरात जगभरातून 30 टक्के मागणी वाढली असून, ऑनलाईन क्लिकमध्येही कोल्हापुरी चप्पलची सरशी झाली आहे. प्राडा कंपनीच्या जागतिक फॅशन शोमध्ये दाखल झालेल्या कोल्हापुरी चप्पलची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे.
गेल्या 15 वर्षांपासून कोल्हापुरी चप्पलने विविध देशांमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले आहे. विशेषतः, हँडमेड, नैसर्गिक व पर्यावरणपूरक उत्पादने पसंत करणार्या ग्राहकांमध्ये मोठी मागणी आहे. कोल्हापुरी चप्पलचा आंतरराष्ट्रीय विस्तार मोठ्या प्रमाणावर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घडला. कोल्हापूरमधील अनेक उत्पादकांनी स्वतःच्या वेबसाईटद्वारेही थेट परदेशी ग्राहकांपर्यंत संपर्क यंत्रणा राबवली आहे. कोल्हापुरातील अनेक कारागिरांनी जर्मनीतील हस्तकला फेअर, दुबई एक्स्पो, लंडनमधील इंडिया क्राफ्ट वीक या प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. या जोरावर कोल्हापुरी चप्पलची नवी डिझाईन्स आणि फिनिशिंगला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. परंपरागत रचना, अस्सल चामडं आणि कारागिरांच्या कौशल्यावर आधारलेली ही चप्पल आता फॅशन स्टेटमेंट बनली आहे. जागतिक बाजारपेठेत तिची लोकप्रियता वाढत असली, तरी तिची अस्सलता, ओळख आणि भविष्यातील टिकाव यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे.
अमेरिकेत समर वेअर म्हणून वापर
जपानमध्ये पारंपरिक किमोनो ड्रेससोबत वापर
ऑस्ट्रेलियात फेस्टिव्हल फॅशनमध्ये कोल्हापुरी विशेष ट्रेंडिंग
युरोपमध्ये बोहो व व्हिंटेज स्टाईलमध्ये कोल्हापुरीची मागणी
अमेरिका : भारतीय समुदाय, क्राफ्ट स्टोअर्स, इको-फ्रेंडली फॅशन स्टोअर्स
लंडन : भारतीय वस्त्र विक्रेते, फॅशन डिझायनर्स
जर्मनी : ऑरगॅनिक आणि क्राफ्टप्रेमी ग्राहक
दुबई : शारजाहतील इंडियन फॅशन मॉल्स
ऑस्ट्रेलिया : मेलबर्न, सिडनी येथील इंडियन हँडीक्राफ्ट स्टोअर्स
जपान आणि कोरिया : फ्यूजन फॅशन ट्रेंड करणारी तरुणाई
आफ्रिका : नैसर्गिक चामड्याची पसंती असलेला ग्राहकवर्ग