भेसळीमुळे कोल्हापुरी जेवणाची चव पार हरवून गेल्याचे दिसत आहे. Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूरचा लौकिक हरवतोय ‘तांबडा-पांढरा’, भेसळीने बिघडवली जेवणाची चव!

भाविकांसह पर्यटक टाळताहेत कोल्हापुरी जेवण :

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सुनील कदम

अनेक चांगल्या गोष्टींमुळे सातासमुद्रापार कोल्हापूरची ख्याती पसरलेली आहे. त्यामध्ये कोल्हापुरी जेवणाचेही एक ‘मानाचे पान’ आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये भेसळीमुळे कोल्हापुरी जेवणाची चव पार हरवून गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे पर्यटक आणि खवय्ये लोक हळूहळू कोल्हापुरी जेवणाकडे पाठ फिरवताना दिसू लागले आहेत.

अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज हजारो लोक कोल्हापुरात येत असतात. पन्हाळा किल्ला पाहण्यासाठीही दररोज हजारो पर्यटक राज्यासह परराज्यातून येत असतात. या लोकांनी आपापल्या भागात मांसाहारी कोल्हापुरी जेवण आणि प्रामुख्याने ‘कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा’ यांची खासियत आणि ख्याती ऐकलेली असते. त्यामुळे इथे आले की एकदा का होईना, इथल्या जेवणावर हात मारण्याची त्यांची इच्छा असते. पण गेल्या काही दिवसांत भेसळीमुळे आणि प्रामुख्याने कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीत शिरलेल्या काही उपटसुंभांमुळे कोल्हापुरी जेवणासह तांबडा-पांढरा रस्साही बदनाम होताना दिसत आहे. जेवणाच्या बाबतीत कोल्हापुरात भ्रमनिरास झाल्याचे अनेक भाविक व पर्यटक बोलून दाखवत आहेत. अस्सल कोल्हापुरी जेवणाची खासियत कशात असेल तर ती वेगवेगळ्या मसाल्यांच्या पदार्थांमध्ये. या मसाल्याच्या पदार्थांमुळे तर इथल्या जेवणाची लज्जत पार साता समुद्रापार पोहोचलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या कोल्हापुरी जेवणाच्या फोडणीला भेसळीचा ‘ठसका’ लागताना दिसत आहे. त्यामुळे अस्सल कोल्हापुरी जेवणाची जिभेवर रेंगाळणारी चव आता बेचव होताना दिसत आहे.

तमालपत्र, बडीशेप, चक्रफूल, मिरे, ओवा, काळा जिरा, दालचिनी, धणे, जिरे, कडीपत्ता, लवंग, वेलदोडा, मेथी, मोहरी, तीळ, चिंच, केशर, खसखस, हळद हे मसाल्याचे पदार्थ म्हणजे कोल्हापुरी जेवणाचे सार आहे. मात्र अलीकडील काही वर्षांत या मसाल्याच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आढळून येऊ लागली आहे. तमालपत्र म्हणून कोणत्या तरी जंगली झाडाची पाने गळ्यात मारली जात आहेत. चक्रफुलाच्या नावाखाली भलतेच काहीतरी ग्राहकांच्या माथी मारून त्याला उल्लू बनविण्याचा उद्योग चालतो. तेल आणि अर्क काढून घेतलेल्या लवंगा, वेलदोडे आणि मिरे ग्राहकांच्या डोक्यावर वाटण्याचा उद्योग खुलेआम सुरू आहे. भेसळीचा ओवा ग्राहकांची पोटदुखी वाढवायला कारणीभूत ठरू लागला आहे. काळा जिरा म्हणून कसल्याही झाडाच्या बिया गळ्यात मारल्या जात आहेत. दालचिनी म्हणून भलत्याच झाडाची साल ग्राहकाला चिकटवली जात आहे. धना किंवा धना पावडरीतील लाकडाच्या भुशाची भेसळ तर ‘धन्य धन्य’ म्हणावी अशा स्वरूपाची आहे.

धोतरा ही एक विषारी वनस्पती आहे. आपल्या आजूबाजूला रानावनात काटेरी बोंडे असलेली ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळून येते. या धोतर्‍याच्या बोंडाच्या आतमध्ये ज्या काळ्या बिया असतात, त्या दिसायला हुबेहूब मोहरीसारख्या दिसतात. पण विषारी असतात. या बिया खाण्यात आल्या तर माणसाचीच काय, पण जनावराचीसुद्धा बुद्धी भ्रष्ट होण्याचा धोका असतो. मात्र भेसळीच्या धंद्यातील बक्कळ पैशामुळे मती भ्रष्ट झालेली काही मंडळी या धोतर्‍याच्या बिया मोहरीत मिसळताना दिसतात. आता याचा काय परिणाम होत असेल, ते सांगायलाच पाहिजे असे नाही. तिळामध्ये कुर्डू म्हणून ओळखल्या जाणार्‍या वनस्पतीच्या शिजवलेल्या बिया मिसळल्या जात आहेत. केशर म्हणून मक्याच्या कणसावर तरंगणारे तुरे ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. खसखशीत गव्हाचा रवा आणि हळदीत चक्क खडूची पावडर किंवा पिवळ्या रंगाचा वापर केला जात आहे. मसाल्याच्या पदार्थांमधील या असल्या भेसळीमुळे अस्सल कोल्हापुरी जेवणाची लज्जत हळूहळू बेचव होताना दिसत आहे.

मसाल्यातील भेसळ ओळखण्याची पद्धत!

धना पावडर खरी असेल तर पाण्यावर तरंगते आणि लाकडाचा भुसा बुडतो. जिरे हातावर चोळताच काळे पडले तर शंभर टक्के बोगस. अर्क आणि तेल काढलेल्या मिरीला रॉकेलसारखा वास येतो आणि ते प्रमाणापेक्षा जास्त चमकतात. भेसळीच्या हळद पावडरीत पाच थेंब हायड्रोक्लोरीक अ‍ॅसिड आणि पाच थेंब पाणी टाकले की त्याला वांग्यासारखा वास येतो. असली हळद खाणे म्हणजे कर्करोगाला हमखास निमंत्रण. दालचिनी हातावर रगडल्यावर त्याचा रंग आणि वास हाताला लागला तरच ती अस्सल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT