कोल्हापूर : नवी दिल्ली येथे केंद्र सरकारतर्फे आयोजित केलेल्या ब्रिक्स महोत्सवात कोल्हापुरी चप्पलचा डंका पाहायला मिळत आहे. महोत्सवात महाराष्ट्रातून कोल्हापुरी चप्पलचा एकमेव स्टॉल आहे. कोल्हापूरच्या बाजीराव सातपुते यांना ही संधी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय अधिवेशनात सहभागी १९ देशांचे प्रतिनिधी या महोत्सवाला भेट देणार आहेत. त्यामुळे या देशांमध्ये कोल्हापूर चप्पलच्या माध्यमातून कोल्हापूरची ओळख पोहोचणार आहे.
नवी दिल्ली येथे २६ आणि २७ ऑक्टोबरदरम्यान आंतरराष्ट्रीय संसदीय संमेलन होत आहे. सोमवारी भारताच्या अध्यक्षतेखाली या संमेलनाला सुरुवात झाली. दरम्यान, संमेलन ठिकाणी ब्रिक्स महोत्सवाचेही याच कालावधीत आयोजन केले आहे. देशभरातील वैशिष्ट्यपूर्ण अशा ४८ वस्तूंचे स्टॉल या महोत्सवात उभे आहेत. त्यापैकी एक स्टॉल कोल्हापुरी चप्पलचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हा एकमेव स्टॉल असून विशेषत: तो कोल्हापूरमधील मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथील सातपुते यांचा आहे. सातपुते यांनी केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेतून त्यांच्या कोल्हापुरी चप्पलच्या व्यवसायाला आधुनिकीकरणाचा टच दिला आहे. त्यामुळे यापूर्वीही केंद्र सरकारच्या अशा महोत्सवामध्ये त्यांनी कोल्हापुरी चप्पलचे मार्केटिंग केले आहे.
१५० अर्जांतून सातपुते यांची निवड
ब्रिक्स महोत्सवातील स्टॉलसाठी महाराष्ट्रातून सुमारे १५० अर्ज आले होते. यामधून मल्हारपेठ येथील सातपुते यांच्या कोल्हापुरी चप्पलच्या अर्जाची स्टॉलसाठी निवड करण्यात आली.
केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेतून व्यवसायाला गती दिली. व्यवसायात सातत्य ठेवल्याने केंद्र सरकारच्या विविध महोत्सवांतर्गत देशातील विविध राज्यांसह परदेशातही कोल्हापुरी चप्पलची ओळख पोहोचविण्याची संधी मिळाली.बाजीराव सातपुते, कोल्हापुरी चप्पल कारागीर