कोल्हापूर : भारतीय पारंपरिक कलेची ओळख असलेल्या अस्सल कोल्हापुरी चपलांना आता जागतिक स्तरावरील फॅशन विश्वाचे नवे व्यासपीठ खुले झाले आहे. इटली येथील आघाडीचा लक्झरी ब्रँड प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स फेब्रुवारी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात आणणार आहे. यामुळे कोल्हापुरी चप्पल आता आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड ठरणार आहे.
या कोल्हापुरी चपलांच्या प्रत्येक जोडची किंमत सुमारे 85,000 रुपये (800 युरो) इतकी असणार आहे. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली, भारत व्यापारी परिषदेत कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी प्राडा, संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ (लिडकॉम ) आणि डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ (लिडकार) यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
या विशेष कलेक्शनच्या माध्यमातून प्राडा भारतीय कारागिरांच्या कलेला जागतिक लक्झरी उत्पादनांच्या श्रेणीत स्थान देणार आहे. सांस्कृतिक आदानप्रदान, आधुनिक डिझाईन आणि पारंपरिक कौशल्य यांचा संगम असलेला हा प्रकल्प कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बेळगाव, बागलकोट, धारवाड आणि विजयपूर या आठ जिल्ह्यांतील चप्पलकारांसाठी नवी आर्थिक संधी निर्माण करणार आहे. तसेच या करारामुळे कोल्हापुरी चपला केवळ मफॅशन आयकॉनफ नव्हे तर जागतिक मलक्झरी ब्रँण्डफ म्हणूनही ओळख होणार आहे. करारामध्ये तीन वर्षांचा कौशल्यविकास कार्यक्रमही समाविष्ट असून भारतातील कारागिरांसाठी प्राडा अॅकॅडमी (इटली) मध्ये अल्पकालीन प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. स्थानिक हातकौशल्याचा विकास, रोजगारनिर्मिती आणि आधुनिक फॅशन क्षेत्राशी थेट संपर्क यामुळे कारागिरांच्या नव्या पिढीलाही प्रोत्साहन मिळणार आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे ठोस पाठबळ लाभले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे सक्रिय मार्गदर्शन मिळाले आहे. हा करार प्रधान सचिव तथा लिडकॉमचे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांच्या धोरणात्मक नियोजनांतर्गत झाला आहे.
लिमिटेड इडिशन असेल चप्पल
प्राडा जागतिक पातळीवर आपल्या पहिल्या भारतीय निर्मित लक्झरी कोल्हापुरी चपलांचा मर्यादित संग्रह (लिमिटेड इडिशन) फेब्रुवारी 2026 मध्ये आणणार असून, जगभरातील 40 विक्री केंद्रांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळावर ते विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या चपलांच्या प्रत्येक जोडची किंमत सुमारे सुमारे 85,000 रुपये (800 युरो) इतकी असणार असून, सुमारे दोन हजार जोड महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांकडून तयार केले जाणार आहेत.