कोल्हापूर : इटलीतील लक्झरी ब्रँड अशी ख्याती असलेल्या प्राडा कंपनीच्या जागतिक फॅशन रॅम्पवर कोल्हापुरी चप्पल पोहोचल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापुरी चप्पलनिर्मिती करणार्या कारागिरांना सुवर्णसंधीचे दालन खुले झाले आहे. जागतिक बाजारपेठ व आंतरराष्ट्रीय फॅशन जगतातील मुख्य प्रवाहात येणार्या कोल्हापुरी चप्पलला प्राडाची साथ मिळाल्यामुळे कोल्हापुरातील कारागिरांनाही भरारी घेण्यासाठी नवे आकाश खुले झाले आहे. प्राडा कंपनी, लिडकॉम व लिडकार या संस्था यांच्यातील व्यापारी कराराचा थेट फायदा कोल्हापुरातील चप्पल कारागिरांना होणार असल्याने उत्साहाला भरती आली आहे. या करारामुळे कारागिरांच्या हाताला थेट आर्थिक, तांत्रिक आणि व्यावसायिक बळ मिळणार आहे.
कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापूरच्या पारंपरिक कौशल्याची ओळख आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापुरी चप्पलचा रुबाब जगभरातील लोकांना खुणावत आला आहे. कोल्हापुरात जवळपास दहा हजार कारागीर कोल्हापूर चप्पलनिर्मितीमध्ये काम करतात. यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय आहे. गेल्या काही वर्षांत कोल्हापुरात वाढत्या पर्यटनामुळे कोल्हापुरी चप्पलची स्थानिक बाजारपेठ वधारली आहे. आता प्राडा या जागतिक कंपनीने करारासाठी हात पुढे केल्यानंतर कोल्हापुरी चप्पल उत्पादनाला चालना मिळण्याचे वर्तुळही विस्तारले आहे.
कोल्हापुरातील चप्पल कारागिरांना असा होणार थेट फायदा दीर्घकालीन मागणी, निश्चित उत्पन्न आतापर्यंत कारागिरांना अनियमित बाजारपेठ, हंगामी मागणी आणि व्यापार्यांवर अवलंबून राहावे लागत होते. प्राडा कंपनीकडून होणारी थेट खरेदी आणि दीर्घकालीन ऑर्डर यामुळे त्यांचे मासिक उत्पन्न स्थिर होणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे मिळणार प्रशिक्षण
लिडकॉम-लिडकारमार्फत कारागिरांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे पारंपारिक कौशल्याला आंतरराष्ट्रीय मानकांची जोड मिळेल.
उत्पादनाला मिळणारा ‘ग्लोबल प्रीमियम’
आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगमुळे उत्पादनाची किंमत 85 हजारांपर्यंत पोहोचणार आहे. याचा थेट फायदा कारागिरांच्या उत्पन्नात 50 टक्क्यांहून अधिक वाढ करणारा आहे.
रोजगारवाढीतून तरुणांसाठी नवे मार्ग
मागणी वाढल्यास शिवणकाम, कातडी प्रक्रिया, डिझाईनिंग, पॅकिंग, लॉजिस्टिक्स अशा अनेक क्षेत्रांत नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. ग्रामीण भागातील अनेक तरुणांना गावातच काम मिळू शकते.
यंत्रसामग्री, कच्च्या मालासाठी विशेष सुविधा
लिडकॉम-लिडकार कारागिरांना कच्चा माल उपलब्धता, गुणवत्ता तपासणी, आधुनिक कटिंग मशिन, शिवण साधने आणि उत्पादन केंद्रे उपलब्ध करून देणार आहेत. काही ठिकाणी सरकारी योजनेतून व्याज अनुदानित कर्ज देण्यावरही विचार सुरू आहे.