Kolhapur ZP Panchayat Samiti election | बंडोबांना थंड करण्यासाठी नेत्यांची धावपळ 
कोल्हापूर

Kolhapur ZP Panchayat Samiti election | बंडोबांना थंड करण्यासाठी नेत्यांची धावपळ

ताकदवान बंडखोरांना ‘स्वीकृत’सह सहकारी संस्थांचे गाजर : काहींचे फोन नॉट रिचेबल

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आठ वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकांमध्ये आता कुणाचीही थांबण्याची तयारी नसल्यामुळे त्यातूनच बंडखोरीचे पीक मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बंडखोरी कशी थोपवायची, असा मोठा प्रश्न नेत्यांसमोर उभा राहिला आहे. त्यासाठी नेत्यांनी आता कंबर कसली असून ताकदवान बंडोबांना शांत करण्यासाठी स्वीकृतसह अन्य सहकारी संस्थांमधील पदांचे गाजर दाखवत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत काही बंडखोर नॉट रिचेबल झाले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे उमेदवारी देताना नेत्यांची डोकेदुखी झाली होती. अधिकृत उमेदवारी जाहीर होताच नाराज इच्छुक रिंगणात उतरू नयेत, म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब लावला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आपल्या उमेदवारांची यादी तरी जाहीर केली. महायुतीने आपल्या उमेदवारांची यादीच जाहीर केली नाही. उमेदवारांना एबी फॉर्म देऊन विषय संपविला.

उमेदवारीसाठी इच्छुक मागणी करू लागले तेव्हा सुरुवातीला सर्वांनाच अर्ज भरण्यास सांगण्यात आल्यामुळे देखील यावेळी उमेदवारांची संख्या वाढली आहे. परंतु आता माघारीसाठी यंत्रणा गतिमान करण्यात आल्या आहेत. यासाठी पक्षांचे नेते, जिल्हातील पदाधिकारी थेट इच्छुकांच्या घरी जाऊन भेटी घेऊ लागल्या आहेत. ‘आत्ता थोडा संयम ठेवा, पुढील टप्प्यात तुमच्यासाठी संधी आहे’, असे सांगत पुढील कमिटमेंट देऊन इच्छुकांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी संघटनेतील महत्त्वाची जबाबदारी, तर काही ठिकाणी सहकारी संस्थांमधील निवडणुकीतील उमेदवारीची हमी दिली जात आहे.

ताकदवान बंडखोरांना तर ‘स्वीकृत’चे गाजर दाखवले जात असल्याची चर्चा रंगली आहे. ज्या मतदारसंघात बंडखोर प्रभावी असून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी थेट तडजोडीचा मार्ग स्वीकारला जात आहे. प्रचाराला वेळ कमी आहे. निवडणुकीची धामधूम एका बाजूला आणि दुसरीकडे बंडखोरीची धग शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय नाट्य रंगणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT