आशिष ल. पाटील
गुडाळ : जिल्हा परिषदेमधील चार विषय समिती सभापती पदांच्या निवडी सोमवार (दि.30 मार्च) रोजी होत असून जि.प.मध्ये बहुमतात असलेल्या महायुतीमधील घटक पक्षांनी समित्यांचे वाटप करून घेतले आहे. आता आपल्या घटक पक्षाला आलेल्या समितीच्या सभापती पदावर वर्णी लावण्यासाठी त्या त्या पक्षातील इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
कोल्हापूर जिल्हापरिषदेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली असून 17 मार्च रोजी झालेल्या बिनविरोध निवडीत अध्यक्ष पद राष्ट्रवादीला तर उपाध्यक्ष पद भाजपाला मिळाले आहे. जि. प. मध्ये बांधकाम व कृषी, शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण आणि समाज कल्याण अशा चार विषय समित्या कार्यरत असतात. चारच दिवसांपूर्वी महायुतीमधील घटक पक्ष्यांच्या नेत्यांची बैठक होऊन या समित्यांचे वाटप झाले आहे. त्यानुसार बांधकाम व कृषी समिती शिवसेनेकडे, शिक्षण व आरोग्य समिती जनसुराज्यकडे, महिला व बालकल्याण समिती राष्ट्रवादीकडे, तर आ. यड्रावकरांच्या शाहू आघाडीकडे समाज कल्याण समिती देण्यात आली आहे. आता 30 मार्चला या विषय समितीच्या सभापती पदांच्या आणि त्यानंतर या समित्यावरील सदस्यांच्या निवडी होतील.
बांधकाम आणि कृषी सभापती पद मिळणाऱ्या शिवसेनेकडे नऊ सदस्य असून त्यापैकी तब्बल चार सदस्य ना. आबिटकर समर्थक आहेत. चार पैकी सौ. रोहिणी अर्जुन आबिटकर यांची दुसरी टर्म असली तरी आबिटकर बंधू हे पद घरात न स्वीकारता गेल्या वेळी प्रमाणे कार्यकर्त्याकडे सोपवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री शिवसेनेचे गटनेते अरुण जाधव यांना संधी देणार की भुदरगड मध्ये कुणाचे कल्याण करणार याबाबत उत्सुकता आहे. आ. चंद्रदीप नरके यांच्या करवीर मतदारसंघातील दोन सदस्य निवडून आले आहेत. त्यापैकी इंद्रजीत पाटील(वडणगे) सभापती पदाचे प्रमुख दावेदार आहेत. हातकणंगल्यात खासदार गटाचे तीन सदस्य असले तरी ते नवखे असल्याने दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
जनसुराज्यकडे शिक्षण आणि आरोग्य सभापती पद जाणार असून माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर आणि माजी शिक्षण सभापती अमरभाऊ पाटील या दोघांपैकी एका सदस्याची येथे वर्णी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे महिला व बालकल्याण सभापती पद असून सर्वाधिक महिला सदस्य या पक्षाकडे असल्याने साहजिकच या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. चंदगडच्या सौ.विद्या विलास पाटील दुसऱ्यांदा निवडून आल्या असून त्यांच्यासह चंदगडच्याच कु. मानसी भोगन या ही सभापती पदासाठी इच्छुक आहेत. मानसिंग गायकवाड यांच्या स्मूषा सौ राजकुवर गायकवाड, करवीरमधून राहुल पाटील समर्थक रेखा मुगडे आणि राधानगरी मधून अरुणकुमार डोंगळे यांच्या कन्या कु. अमृता डोंगळे यांचाही इच्छुकां मध्ये समावेश आहे. भौगोलिक समतोल साधण्यासाठी राष्ट्रवादीचे हे पद गडहिंग्लज विभागात जाण्याची शक्यता अधिक आहे.
समाज कल्याण समिती आ. राजेंद्र यड्रावकर यांच्या शाहू आघाडीला देण्यात येणार आहे. या आघाडीकडे असलेल्या अनुसूचित जातीच्या एकमेव सदस्या सौ. श्रद्धा गायकवाड यांची या समितीच्या सभापतीपदी निवड निश्चित मानले जाते. उर्वरित तीन सभापती पदाची लॉटरी कोणा - कोणाला लागणार याकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.