Kolhapur ZP Elections Pudhari
कोल्हापूर

Kolhapur ZP Elections: झेडपीसाठी उद्या माघार

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि. 27) दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि. 27) दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत. माघारीसाठी केवळ चारच तासांचा अवधी असल्याने साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब सुरू आहे.

माघारीची मुदत संपल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता चिन्हवाटप होईल आणि जिल्ह्यातील सर्व लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेला 906 तर पंचायत समितीसाठी 1526 अर्ज दाखल झाले आहेत. या दाखल अर्जांची छाननी झाल्यानंतर शुक्रवार आणि शनिवारी काही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

रविवार व सोमवारी प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी असल्याने मंगळवारी एकच दिवस उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मिळणार आहे. कोणत्या उमेदवारांमुळे मतदारसंघात कोणते परिणाम होतील, कोणामुळे आणि कसा फटका बसू शकेल, याबाबतही तपशीलवार चर्चा करून अडचणीचे ठरणाऱ्या उमदेवारांना माघारीसाठी विनंती केली जात आहे. त्यांना आश्वासने दिली जात आहेत, प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या जात आहेत.

कुटुंबातील सदस्यांसह मित्र-मंडळीकरवी माघारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. उमेदवार ज्याचा समर्थक आहे, ज्यांचे ऐकतो, ज्यांना मानतो, अशांनाही मध्यस्थी करायला लावले जात आहे. त्यातूनही न ऐकणाऱ्यांवर दबावही आणला जात आहे. विरोधकांना अडचण निर्माण करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज कायम राहतील, याकरिता अर्ज मागे न घेण्यासाठीही अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत.

मंगळवारी दुपारनंतर चित्र स्पष्ट

मंगळवारी दुपारी तीनपर्यंत माघार घेतली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. त्यांना दुपारी साडेतीन वाजता चिन्ह वाटप केले जाईल. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 68 मतदारसंघात आणि पंचायत समितीच्या 136 मतदारसंघात लढत कशी होईल, याचे चित्र त्यानंतरच स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 5 फेबुवारीला मतदान होत आहे.

काही उमेदवार नॉट रिचेबल

काही उमेदवार अर्ज माघारीसाठी दबाव येण्याच्या शक्यतेने नॉट रिचेबल आहेत. त्यांचाही विविध यंत्रणेमार्फत शोध सुरू आहे. कार्यकर्ते अशा उमेदवारांचा शोध घेत असल्याचेही चित्र काही मतदारसंघात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT