Kolhapur ZP Result Shirol Taluka Candidate:
कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील तीन मतदार संघातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक मतमोजणीत १२ व्या फेरीअखेर १,५०० पेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाल्याने काही उमेदवारांनी विजय निश्चित मानत गुलाल लावून जल्लोष केला. मात्र काही क्षणातच ही लीड झपाट्याने कमी होत गेली आणि शेवटी पराभवाला सामोरे जावे लागल्याने गुलाल पुसून शांतपणे घरात बसण्याची वेळ आली. या अनपेक्षित घडामोडींमुळे संपूर्ण शिरोळ तालुक्यात एकच चर्चा रंगली.
आघाडी मिळताच मतमोजणी केंद्रावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, तर सोशल मीडियावर “हार्दिक अभिनंदन”, “भावी जि.प./पं.स. सदस्य” असे पोस्ट, स्टेटस आणि आकर्षक वालपेपर काही मिनिटांतच झळकले. उमेदवारांचे फोटो विजयाचा शिक्का बसल्यासारखे व्हायरल झाले.
मात्र १३ व्या फेरीपासून चित्र झपाट्याने बदलले. मतांची आघाडी हळूहळू घसरू लागली आणि वातावरणातील उत्साह क्षणातच चिंतेत बदलला. सोशल मीडियावर अभिनंदन करणारेच कार्यकर्ते प्रत्यक्षात मतांचे आकडे पुन्हा-पुन्हा तपासत धावपळ करताना दिसू लागले. आघाडी कमी होताच जल्लोष थांबला, गुलालाचा रंग फिकट पडला आणि विजयाचा आत्मविश्वासही गडगडला.
अखेर निकाल जाहीर होताच १२ व्या फेरीत विजयी मानले गेलेले उमेदवार पराभूत ठरले. काही वेळापूर्वीच झळकलेले अभिनंदनाचे पोस्ट हटवण्यात आले, वॉलपेपर गायब झाले, तर काही पोस्टवर उपरोधिक प्रतिक्रिया उमटू लागल्या. या संपूर्ण प्रकारामुळे “मतमोजणी पूर्ण होईपर्यंत काहीही निश्चित नसते” हा राजकीय धडा पुन्हा एकदा ठळक झाला. सध्या शिरोळ तालुक्यात “१२व्या फेरीत गुलाल, सोशल मीडियावर अभिनंदन आणि अखेर गुलाल पुसून घरात बसणे” हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.