Kolhapur ZP Election Result 2026: कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल आज जाहीर झाला. यात महायुतीनं मोठं यश मिळवलं असलं तरी पक्ष म्हणून काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेसने भादोले जिल्हा परिषद गटासाठी रीलस्टार आणि उद्योजिका सोनाली सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी आपण फक्त सोशल मीडियावर स्टार नसून निवडणुकीच्या रिंगणात देखील विजयी होऊ शकतो हे दाखवून दिलं आहे.
सोनाली सावंत यांची उमेदवारीसाठी दिलेल्या मुलाखतीपासूनच सोशल मीडियावर हवा तयार झाली होती. काँग्रेसने त्यांचा जनसंपर्क आणि तरूणांमधील क्रेझ पाहून त्यांना शेवटच्या क्षणी तिकीट दिलं होतं. आमदार सतेज पाटील यांचा हा विश्वास सोनाली सावंत यांनी खरा ठरवला. त्यांनी जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या भादोलेत काँग्रेसला यश मिळवून दिलं.
सोनाली सावंत या हॉटेल व्यावसायिक राहुल सावंत यांच्या पत्नी आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामवर ६ लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
जरी कोल्हापूर जिल्हा परिषदेत सोनाली सावंत यांची एन्ट्री झाली असली तरी पुण्यातील कोरोगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडिया सेन्सेशन निर्मला नवले यांना मात्र पराभवाचा धक्का बसला आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत होत्या. मात्र त्यांचा भाजपच्या मनिषा पाचंगे यांनी पराभव केला आहे.
निर्मला नवले या आयटी इंजिनिअर आहेत. त्या ज्यावेळी सरपंच झाल्या होत्या त्यावेळी त्यांना उच्च शिक्षित सरपंच असं कौतुक देखील झालं होतं.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गोकूळचे दोन माजी संचालकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कसबा तारळेमधून अरूण डोंगळे यांची मुलगी अमृता डोंगळे आणि विश्वास आबाजी पाटील यांचा मुलगा सचिन पाटील हे पाडळी खुर्द येथून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील अमृता डोंगळे यांनी विजय मिळवला आहे. तर विश्वास आबाजी पाटील यांना मोठा धक्का बदला आहे. त्यांचा पुत्र सचिन पाटील यांचा पराभव झाला आहे.