कोल्हापूर : महायुतीच्या बैठकीत बोलताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील. सोबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, आ. विनय कोरे, संजय मंडलिक, आ. अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे आदी.   (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

Kolhapur Zilla Parishad election | जि.प.साठी शक्य तेथे युती; इतरत्र मैत्रीपूर्ण लढती

महायुतीच्या बैठकीत निर्णय : समरजितसिंह घाटगेंचा प्रवेश औपचारिकता

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शक्य तेथे महायुती, जेथे शक्य नाही तेथे मैत्रीपूर्ण लढती करण्याचा निर्णय महायुती नेत्यांच्या बैठकीत घैण्यात आला. येथील अयोध्या हॉटेलमध्ये ही बैठक झाली. दरम्यान, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या पक्षातून विधानसभा निवडणूक लढविलेले समरजितसिंह घाटगे यांनी बैठकीस हजेरी लावली.

समरजितसिंह घाटगे भाजप महायुतीच्या बैठकीत आमच्या मांडीला मांडी लावून बसलेत. त्यामुळे ते भाजपचा घटक बनले आहेत. त्यांचे कार्यकर्ते जि. प. निवडणूक कमळ चिन्हावर लढविणार असल्याने घाटगे यांचा भाजप प्रवेश केवळ औपचारिकता राहिल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. बैठकीमध्ये निवडणूक रणनीती, संघटनात्मक मजबुती, जागावाटप तसेच विजयासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शक्य असल्यास 68 जागांवर युती करा. जास्तीत जास्त घटक पक्षांना एकत्र घेऊन आगामी जिल्हा परिषद लढणार असल्याचे सांगत या युतीमधून विरोधकांना फायदा होणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी, युवक, महिलांसाठीच्या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविल्याने ग्रामीण भागातही महायुतीला चांगला प्रतिसाद मिळून महापालिकेपेक्षाही मोठा विजय जिल्हा परिषदेतही महायुतीला मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या जागावाटपासंदर्भात कोअर कमिटी नेमण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार विनय कोरे यांचा या समितीत समावेश आहे. जागा वाटपाचा तिढा होईल तेथे या समितीमार्फत मार्ग काढला जाणार आहे. याबरोबरच घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची तालुकास्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती तालुक्यातील जागा, इच्छुकांची संख्या आणि एकूण जागा वाटप याबाबत अहवाल तयार करून कोअर कमिटीकडे पाठवेल. त्यानंतर कोअर कमिटी निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खा. धैर्यशील माने व धनंजय महाडिक, माजी मंत्री आमदार विनय कोरे, आ. राहुल आवाडे, आ. अमल महाडिक, आ. शिवाजी पाटील, माजी मंत्री भरमू आण्णा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, समरजित घाटगे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शौमिका महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार संजयबाबा घाटगे, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांच्यासह महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपने मागितल्या 35 ते 40 जागा?

या बैठकीत भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेसाठी 35 ते 40 जागा मागितल्याचे समजते. कोअर कमिटी नेमण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. घटक पक्षांनी आपले प्राबल्य असणार्‍या भागातील जागा सोडून इतर जागांची मागणी केल्याचे सांगण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT