कोल्हापूर

कोल्हापूर : झूम कचरा प्रकल्पाचा ‘कॅन्सर’

Arun Patil
कोल्हापूर : सर्वत्र कचराच कचरा आणि फक्त कचर्‍याचे ढीग… सामान्य व्यक्तीला पाच मिनिटेही थांबणे अशक्य होईल, अशी प्रचंड दुर्गंधी…  शहराच्या कानाकोपर्‍यातून कचरा घेऊन येणारी महापालिकेची टिप्पर वाहने… ओला-सुका असे वर्गीकरण न करता डंपिग करण्यात येणारा कचरा… त्या कचर्‍यावर दाब देत असलेले कर्मचारी… लाईन बझार, कसबा बावडा येथील झूम प्रक्रिया प्रकल्पातील हे दररोज दिसणारे भयावह चित्र.
येथे दररोज सुमारे 200 टन कचरा जमा होतो आणि त्यातील 20 टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते. येणारा कचरा आणि प्रक्रिया होणारा कचरा यातील प्रचंड मोठ्या तफावतीमुळे येथे सुमारे पाच लाखांहून जास्त टन कचरा साठला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातूनच 'महापालिकेची सोय अन् आमचं मरण' अशी भावना स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.
येथील कचर्‍याला लागलेली आग तब्बल आठवड्यानंतरही धुमसत आहे. विविध समस्यांचे आगर असलेला हा झूम कचरा प्रकल्प एकंदरितच शहरासाठी जणू कॅन्सर बनला आहे. त्याचा येथील नागरिकांना 12 महिने 24 तास त्रास होत आहे.
खासगी ठेकेदारांवर कोट्यवधींची उधळपट्टी
शहरात दररोज सुमारे 200 ते 220 टन कचरा जमा होतो. सर्व कचरा झूम प्रकल्पावर टाकला जातो. यापूर्वी कोल्हापूर ग्रीन एनर्जी या कंपनीला कचर्‍यापासून वीजनिर्मितीसाठी ठेका दिला होता; परंतु कंपनीने प्रकल्प अर्धवट सोडला. त्या कंपनीच्याच मशिनरीवर आता महापालिका प्रकल्प चालवित आहे. मात्र, त्यासाठी प्लॅनेट इन्व्हायर्मेंट सर्व्हिसेस या खासगी ठेकेदार कंपनीकडून कामगार घेतले आहेत. त्यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये संबंधित कंपनीवर उधळले जात आहेत. तरीही कचर्‍याचा  डोंगर  उंच होत चालला आहे. मग एवढी उधळपट्टी कुणासाठी? असा प्रश्न निर्माण होत आहे.
प्रकल्प शहराबाहेर हलविण्याची गरज
सन 2000 ते 2001 सालात या परिसरात नागरी वस्ती कमी होती. त्यामुळे महापालिकेने या परिसरातील सुमारे 10 एकर जागा कचर्‍यापासून खतनिर्मितीसाठी झूम कंपनीला दिली. काही महिन्यांतच झूम कंपनीने गाशा गुंडाळला. अलीकडच्या काळात प्रकल्पाच्या भोवती नागरी वस्ती वाढली. कचरा विल्हेवाट लावणारी यंत्रणा तोकडी आहे. कचर्‍याचे डोंगर तयार झाले आहेत. दुर्गंधी, माश्या, डासांचा प्रादुर्भाव यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लाईन बझार परिसराला लागूनच गायकवाड मळा, चौगुले मळा आणि देवार्डे मळा आहे. लाईन बझारमध्ये  भरगच्च वस्ती आहे. सर्किट हाऊसमागे आणि भोसलेवाडीपर्यंत अपार्टमेंट, बंगले आहेत. या परिसरात या प्रकल्पाचा वाईट परिणाम जाणवत असतो. पेटलेल्या कचर्‍याची काजळी या परिसरातील घर, रस्ते, टेरेसवर पसरते. त्यामुळे प्रकल्प शहराबाहेर हलविण्याची गरज आहे.
* दररोज जमा होणारा 220 टन कचरा
* सुमारे पाच लाख टन कचर्‍याचा डोंगर
* कचर्‍याला आगीमुळे धुराचे लोट
* परिसरात प्रचंड दुर्गंधी
* जनावरेही धुरामुळे हैराण
* कचर्‍याची काजळी 1 कि.मी.पर्यंत
* नागरिकांना घसा, त्वचा व डोळ्यांचे विकार
* जागा नसल्याने रोजच टीप्परच्या रांगा
कामगारांना ना मास्क ना हँडग्लोज 
दै. 'पुढारी' टीमने सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत झूम प्रकल्पावर ऑन द स्पॉट पाहणी केली. महापालिकेच्या वतीने रडतखडत सुरू असलेला हा प्रकल्प कचर्‍याच्या डोंगरात हरवला आहे. येथे कचर्‍यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना ना हँडग्लोज आहेत ना मास्क. शिवाय परिसरात भटक्या कुत्र्यांच्या मोठा वावर आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कोणतीही सुविधा नसल्याचे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT