कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रभाग निश्चितीच्या पाठोपाठ आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघाची रचना व सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना आदेश दिला आहे. लोकसंख्येवर आधारित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघांची रचना व सदस्य संख्या निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील जि.प. सदस्यांची संख्या एकने वाढून 68 होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मुदत सपंलेल्या राज्यातील 32 जिल्हा परिषद व 336 पंचायत समितीच्या निवडणुका चार महिन्यात पार पाडण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे या निवडणुका वेळेत पार पाडण्यासाठी मतदारसंघ वेळेत निश्चित करण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्यांवर सोपविली आहे. मतदारसंघांची संख्या निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने ती प्रसिद्ध करावयाची आहे. जि.प. व पं.स. क्षेत्रातील ग्रामीण लोकसंख्या, अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या, प्रगणक गटाचे नकाशे व घरयादी जनगणना कार्यालयाकडून उपलब्ध करून घेत लगतच्या लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघाची रचना करावयाची आहे.
जिल्हा परिषदांसाठी कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. मतदारसंघाची रचना करताना एकूण लोकसंख्या भागिले त्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची एकूण सदस्य संख्या या सत्रानुसार जि.प. मतदारसंघातील लोकसंख्या निश्चित करावी. ती करताना मतदारसंघाच्या सरासरी लोकसंख्येच्या दहा टक्के कमी किंवा दहा टक्के जास्त या मर्यादेत ठेवता येईल. सन 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदारसंघांची रचना विचारात घेऊन या निवडणुकीत कार्यवाही करावयाची आहे. याशिवाय मतदारसंघाची रचना करत असताना भौगोलिक सलगता राहील तसेच एका ग्रामपंचायतीचे दोन जिल्हा परिषद मतदारसंघात विभागणी होणार नाही याचीही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीमांचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, रेल्वे लाईन तसेच पूर्व, पश्चिम असा दिशांचा प्रामुख्याने उल्लेख असला पाहिजे. मतदारसंघाला नाव देत असताना त्या मतदारसंघातील सर्वाधिक लोकसंख्या असणार्या गावाचे नाव मतदारसंघाला नाव द्यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
जि.प. व पं.स. मतदारसंघाची रचना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व संगणक तज्ञ यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.