कोल्हापूर : जिल्हा परिषद अंतर्गत विकासकामांसाठी होणारे निधीवाटप आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधी वाटपावरून निर्माण झालेला वाद आता सामंजस्याने सोडविण्याचा निर्णय सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी घेतला आहे. यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रित बैठक घेऊन तसेच वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत या अध्यक्षस्थानी होत्या.
जिल्हा परिषद अंतर्गत विकासकामांसाठी निधीचे न्याय्य वाटप व्हावे, जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपातील असमानता दूर करावी, जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार अबाधित राहावेत, या मागण्यांसाठी विरोधी काँग्रेसच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनाची दखल घेत अध्यक्ष शिल्पा खोत आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात विरोधी सदस्यांसमवेत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत निधीवाटपाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनांचा निधी सर्व सदस्यांना पारंपरिक पद्धतीने वाटप करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यापुढेही सर्व योजनांचा निधी न्याय्य पद्धतीने वाटप केला जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष खोत यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीबाबत मात्र स्वतंत्र धोरण आणि यंत्रणा असल्याचे अध्यक्ष खोत यांनी स्पष्ट केले. या निधीचे सूत्र, धोरण आणि वाटपाचे अधिकार जिल्हा नियोजन समितीकडे आहेत. त्यामुळे एखाद्या सदस्याला कमी निधी मिळाल्याची तक्रार असल्यास सर्व सदस्यांनी एकत्रितपणे शासन दरबारी पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. एकत्रितपणे शासनाकडे पाठपुरावा करण्याची तयारीही दर्शविण्यात आली आहे. मतदारसंघात १५ व्या वित्त आयोगांतर्गत विकासकामांसाठी देण्यात येणारी प्रशासकीय मान्यता पत्रे लवकरात लवकर घेऊन मतदारसंघातील विकासकामे सुरू करावीत, असे आवाहनही खोत यांनी केले.
जिल्हा परिषदेतील सर्व सदस्यांना जास्तीत जास्त विकासनिधी मिळावा, यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून निधीचा प्रश्न मार्गी लावावा, असे बैठकीत ठरले. बैठकीला बांधकाम सभापती सरिता नांदेकर, शिक्षण समिती सभापती शीतल यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उपोषणात सहभागी सदस्य
काँग्रेसचे सदस्य अभिजित तायशेटे, सागर धुंदरे, एकनाथ पाटील, रेश्मा देसाई, राहुल आवळे, अमर पाटील, सुदर्शन खोत, शुभांगी कुंभार, रणधीर मोरे आदी विरोधी गटाचे सदस्य उपोषणात सहभागी झाले होते. उपोषणादरम्यान ‘निधी आमच्या हक्काचा’, ‘हक्काचा निधी मिळालाच पाहिजे’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
महायुतीच्या सदस्यांची बैठक लांबणीवर
निधी वाटपप्रश्नी शुक्रवारी सत्ताधारी महायुतीच्या सदस्यांची बैठक होणार होती. पण, बैठक झाली नाही. ती लांबणीवर पडली आहे.