विकास कांबळे
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाल्यामुळे या मतदारसंघातील लढती अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि भविष्यातील नेतृत्व ठरविणार्या बनल्या आहेत. या निवडणुकीत कुणी आपली राजकीय वारसदार म्हणून मुलगीस पुढे केले आहे, तर कुणी पत्नीला जबाबदारी दिली आहे. काही ठिकाणी तर सुनेलाच राजकीय मैदानात उतरविल्याने ही निवडणूक नव्या चेहर्यांची आणि त्यामागे असणार्या राजकीय ताकदीची असणार आहे. या मतदारसंघातील विजयी उमेदवारांच्या गळ्यातच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ पडणार असल्यामुळे या मतदारसंघांबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत 50 महिलांना आरक्षण आहे. यामध्ये ओबीसी, अनुसूचित जातीमधील महिला यांचेदेखील आरक्षण असते. याशिवाय सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग आरक्षित असतात. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या 19 मतदारसंघांतील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पन्हाळा तालुक्यातील यवलूज मतदारसंघातून जिल्हा परिषद माजी सदस्या कल्पना चौगले यांना पुन्हा भाजपने संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने पूजा दिलीप पाटील, काँग्रेसने त्रिवेणी पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाने अर्चना पाटील व ठाकरे शिवसेनेने वैशाली पवार यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी चौरंगी लढत होत आहे.
हातकणंगले तालुक्यात कुंभोजमध्ये महायुतीमधील दोन घटक पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये भाजपच्या सन्मती चौगले व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या शीतल यादव यांचा समावेश आहे. याशिवाय स्वाभिमानी-काँग्रेस आघाडीकडून अलका कागवाडे निवडणूक लढवत आहेत. कोरोची मतदासंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघातून आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे निवडणूक रिंगणात भाजपकडून उतरल्या आहेत. या मतदारसंघातून गेल्यावेळी प्रसाद खोबरे भाजपचे प्रतिनिधित्व करत होते; परंतु यावेळी त्यांना नेत्यांच्या वारसदारांसाठी पंचायत समितीची उमेदवारी दिली आहे. आवाडे यांच्याविरोधात स्वाभिमानी-काँग्रेस आघाडीच्या दीपाली कोराणे यांनी आव्हान दिले आहे. शिरोळ तालुक्यातील दत्तवाडमध्ये काँग्रेसच्या राधा उदय पाटील, भाजपच्या मृणालिनीराजे पाटील व शाहू आघाडीच्या उत्तरा शिंदे अशी तिरंगी लढत आहे.
आवाडे यांची चौथी पिढी
जि. प.च्या निवडणुकीच्या निमित्ताने आवाडे कुटुंबातील चौथी पिढी राजकारणात येत आहे. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, त्यांचे पुत्र प्रकाश आवाडे, नातू आमदार राहुल आवाडे आणि आता राहुल यांची मुलगी सानिका आवाडे कोरोची मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. जि. प. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने सानिका यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
कागल, करवीर, गगनबावड्यात चुरस
बोरवडेत जिल्हा परिषद माजी सदस्य व ‘बिद्री’चे उपाध्यक्ष मनोज फराकटे यांच्या मातोश्री शोभाताई फराकटे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बंडखोरी केलेल्या शीतल फराकटे या शिंदे शिवसेनेकडून रिंगणात उतरल्या आहेत. याठिकाणी वारसदार विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी लढत आहे. चिखली जि.प. मतदारसंघातून भाजपने माजी सभापती शिवानी भोसले यांना पुन्हा संधी दिली आहे. भोसले या गेल्यावेळी मंडलिक गटाकडून निवडून आल्या होत्या; परंतु या निवडणुकीत त्या भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात शिंदे शिवसेनेच्या भारती कुराडे यांनी आव्हान उभे केले आहे.
शहराला लागून असलेल्या कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) जि.प. मतदारसंघात चुरशीची लढत आहे. विनिता सागर भोगम, भाजप, मनीष अरुण पाटील काँग्रेस, संजीवनी राहुल पाटील अपक्ष असा तिरंगी सामना दिसत असला तरी प्रत्यक्षात भोगम व पाटील यांच्यातच खरी लढत असल्याचे सांगितले जाते. शिंगणापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या माजी सभापती व विद्यमान सरपंच रसिका अमर पाटील यांना काँग्रेसने पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपने रचना अविनाश पाटील व शिवसेनेने प्रियांका राजेंद्र दिवसे यांना उमेदवारी दिल्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत पाहावयास मिळते. सांगरूळमध्ये देखील शिवसेनेच्या राजश्री खाडे, राष्ट्रवादीच्या रेखाताई मुगडे व काँग्रेसच्या शीतल यादव यांच्यात लढत आहे. तिसंगी (ता. गगनबावडा) जि.प. मतदारसंघातून काँग्रेस व भाजप अशी थेट लढत आहे. काँग्रेसकडून सोनाली पाटील व भाजपच्यावतीने कल्पना एकनाथ शिंदे निवडणूक रिंगणात आहेत.
राधानगरी तालुक्यातील लक्षवेधी लढती
कसबा तारळे जि.प. मतदारसंघात गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आपली कन्या अमृता हिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय वारसदार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्या विरोधात काँग्रेसने भाग्यश्री धीरज डोंगळे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने ऋतुजा रविश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सरवडेतून शिवसेनेच्या पूजा कपिल खोराटे व काँग्रेसच्या संयोगिता रणधीर मोरे यांच्यात थेट लढत आहे.
भुदरगड, गडहिंग्लज,चंदगडमध्ये ‘आर या पार’!
भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील लढत जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे. या मतदारसंघातून जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांच्या पत्नी व जिल्हा परिषद माजी सदस्य रोहिणी आबिटकर यांना शिवसेनेच्या वतीने पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मेघा राजेंद्र देसाई उभ्या ठाकल्या आहेत. या मतदारसंघात थेट दुरंगी लढत आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रतिष्ठेची ही लढत असल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातही थेट दुरंगी सामना आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेश्मा राहुल देसाई या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार असून त्यांच्या विरोधात शिवसेनेने ऋतुजा रणधीर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. कडगाव जि.प. मतदारसंघात शिवसेनेच्या सारिका यशवंत नांदेकर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी जाधव व ठाकरे शिवसेनेच्या धनश्री प्रकाश पाटील यांच्यात तिरंगी लढत आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे जि.प. मतदारसंघातही चुरशीची लढत आहे. या मतदारसंघातून माजी सदस्या शैलजा पाटील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्याविरोधात भाजपच्या मीनाक्षी पाटील व काँग्रेसच्या पौर्णिमा कुराडे लढत आहेत. गिजवणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आमने-सामने लढत आहेत. अडकूरमध्ये काँग्रेसकडून शीतल देसाई राष्ट्रवादीकडून अलकनंदा पाटील व भाजपकडून राजश्री गावडे निवडणूक रिंगणात आहेत. कुदनूर (चंदगड) जिल्हा परिषद मतदारसंघात माजी सभापती ज्योती दीपक पाटील (भाजप) व माजी सदस्या विद्या विलास पाटील (राष्ट्रवादी) यांच्यात काटाजोड लढत होत आहे.