Kolhapur Zilla Parishad 
कोल्हापूर

Kolhapur News : जिल्हा परिषदेच्या सभेला आचारसंहितेचा फटका

जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्याने आजची सभा रद्द

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषदेची बुधवारी (दि. २३) होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी सभा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्याने सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे पत्र अध्यक्षा खोत यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहे.

जिल्हा परिषदेची सभा दर तीन महिन्यांनी घेण्याची तरतूद आहे. नव्या सभागृहाची स्थापना झाल्यानंतर आतापर्यंत केवळ एकच सभा झाली आहे. त्यापूर्वी सुमारे साडेचार वर्षे जिल्हा परिषदेत प्रशासकराज होते. त्यामुळे सदस्यांना सर्वसाधारण सभेतून विविध प्रश्न मांडण्याची आणि प्रशासनाला जाब विचारण्याची संधी मिळाली नव्हती. आता निवडून आलेल्या सदस्यांच्या कामकाजाला सुरुवात होऊन सभांचे नियमित चक्र सुरू होईल, अशी अपेक्षा असतानाच आचारसंहितेमुळे पुन्हा सभेचे कामकाज ठप्प झाले आहे.

निधी वाटपावरून सदस्यांमध्ये धुसफूस

जिल्हा परिषदेत निधी वाटपावरून सदस्यांमध्ये आधीपासूनच धुसफूस सुरू आहे. निधीच्या वाटपावरून काही सदस्य नाराज असून, या नाराजीचे पडसाद बुधवारी होणाऱ्या सभेत उमटण्याची शक्यता होती. विविध विकासकामांसाठी निधीचे वाटप, प्राधान्यक्रम आणि सदस्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांवरून सभेत चर्चा होण्याची शक्यता होती.मात्र, आचारसंहितेचे कारण पुढे करून सभा रद्द करण्यात आल्याने काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सभा रद्द करण्यास आचारसंहितेचे निमित्त मिळाले, अशी कुजबुज काही सदस्यांमध्ये सुरू असून, यावरून पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबतही काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT