‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा परिषद पहिली. Pudhari File Photo
कोल्हापूर

‘माझी वसुंधरा’मध्ये पुणे विभागात कोल्हापूर जि. प. प्रथम

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा परिषद पहिली आली आहे.

दि. 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या अभियानामध्ये 414 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था 22 हजार 218 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. यामध्ये नागरी भागात इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज आणि पन्हाळा यांनी यश मिळविले आहे.

ग्रामपंचायत विभागामध्ये धरणगुत्ती (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीने 5 ते 10 हजार लोकसंख्या गटात राज्यस्तरावरील 75 लाखांचे, तर शेळकेवाडी (ता. करवीर) ग्रामपंचायतीने 1500 पेक्षा कमी लोकसंख्या गटात 50 लाखांचे राज्यस्तरावरील उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले आहे. याशिवाय पुणे विभागात 5 ते 10 हजार लोकसंख्या असणार्‍या गावांमध्ये अंबप (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवून 50 लाखांचे, तर 1500 ते 2500 लोकसंख्येमध्ये अर्जुनी (ता. कागल) ग्रामपंचायत विभागाने तृतीय क्रमांक मिळवून 15 लाखांचे बक्षीस पटकाविले आहे.

इचलकरंजी मनपा राज्यात तिसरी

इचलकरंजी : 2023-24 मध्ये माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था गटामध्ये इचलकरंजी महानगरपालिकेने राज्यस्तरावर तिसरा क्रमांक मिळविला आहे. इचलकरंजी महानगरपालिकेस चार कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले असून, लवकरच सदर बक्षिसाची रक्कम कार्यक्रमाद्वारे प्राप्त होणार आहे, अशी माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT