कोल्हापूर : जिल्हा परिषदेसाठी प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाची (गट) आणि पंचायत समितीच्या मतदारसंघाची (गण) संख्या निश्चित होणार आहे. त्याकरीता लोकसंख्येची माहिती तत्काळ पाठवण्याचे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना ग्रामविकास विभागाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या कामकाजात प्रथम सदस्य संख्या निश्चित होते, त्यानुसार प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविल्या जातात. त्यानंतर प्राधिकृत अधिकारी नियुक्त करून सुनावणी घेतली जाते. प्राधिकृत अधिकार्यानी शिफारशींचा विचार करून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर आरक्षण निश्चितीसाठी सोडत काढली जाते. त्यावर हरकती व सूचना मागवून आरक्षण अंतिम केले जाते.
प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर, त्यानुसार मतदारसंघाचे आरक्षण प्रसिद्ध केले जाते. यानंतर मतदार यादी विभाजन करणे, प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविणे, प्राप्त हरकती व सूचना यांचा विचार करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे, त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. ही सर्व प्रक्रिया सर्वोच्य न्यायालयाने घातलेल्या कालमर्यादेचा विचार करता वेळेत पूर्ण करावी लागणार आहे. याकरीता प्रभाग रचनेची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याने त्याबाबतची माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.
या निवडणुकीसाठी 2011 चीच जनगणनेचा विचार केला जाणार असला तरी गेल्या दहा वर्षांत मतदार संख्येत झालेल्या वाढीमुळे मतदारसंघ कमी-जास्त होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. सर्व माहिती जमा झाल्यानंतर ग्रामविकास विभाग त्याबाबतचा निर्णय घेऊ शकते.