डॅनियल काळे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत असून, येत्या आठवडाभरात ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध पक्षांनी आपापल्या पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत सध्या 68 सदस्य आहेत. त्यामध्ये आता 8 स्वीकृत सदस्यांची भर पडणार आहे. या नियुक्त्यांमुळे काही निष्ठावंत कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार असून, त्याचबरोबर आगामी ‘गोकुळ’ निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या राजकीय तडजोडींनाही चालना मिळणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. फेबुवारीत झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांनंतर अध्यक्ष-उपाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध पार पडली. आता विषय समित्यांच्या निवडणुका होणे बाकी असतानाच सर्वांचे लक्ष स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे केंद्रित झाले आहे. इच्छुकांनी आपापल्या पक्षांतील वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अंतिम निर्णय हा केवळ संख्याबळावर नाही, तर आगामी राजकीय समीकरणे, ‘गोकुळ’ निवडणूक आणि विरोधकांना कसे रोखायचे, यावर घेतला जाणार आहे.
जि.प.तील सध्याचे संख्याबळ
सध्याच्या संख्याबळानुसार, राष्ट्रवादी काँग््रेासकडे सर्वाधिक 20 जागा आहेत. त्यापाठोपाठ काँग््रेास 15, भाजप 12, शिवसेना 9, जनसुराज्य 6 आणि राजर्षी शाहू आघाडी 4 जागांसह इतर पक्षांचे प्रतिनिधित्व आहे. या आकडेवारीच्या आधारे स्वीकृत सदस्यांचे वाटप होणार असून, राष्ट्रवादी काँग््रेास व काँग््रेासला प्रत्येकी 2, तर भाजप, शिवसेना, जनसुराज्य आणि शाहू आघाडीला प्रत्येकी 1 सदस्य नियुक्तीची संधी मिळणार आहे.
‘गोकुळ’च्या सत्तेसाठी स्वीकृतपदाचा मास्टरस्ट्रोक
‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीत संभाव्य बंडखोर किंवा वजनदार नेत्यांना जिल्हा परिषदेत स्थान देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करणे आणि त्याबदल्यात ‘गोकुळ’मध्ये पाठिंबा मिळवणे, असा दुहेरी डाव आखला जात आहे.
निष्ठावंतांच्या पुनर्वसनाची संधी आणि संख्याबळाचा पेच
राष्ट्रवादी आणि काँग््रेासच्या पारड्यात दोन-दोन, तर इतर पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळणार असल्याने वरिष्ठांकडे ‘फिल्डिंग’ लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ही निवड केवळ औपचारिकता नसून, कार्यकर्त्यांना बळ देण्याची रणनीती आहे.