सुनील कदम
कोल्हापूर : पालकांनो, महाविद्यालयात जाणारी, कुठेतरी नोकरी अथवा छोटा-मोठा व्यवसाय करणारी, नेहमी आनंदात वावरणारी तुमची तरुण मुले-मुली आजकाल काहीशी अबोल झाली असतील, चिडचिडी झाली असतील, एकलकोंडी झाली असतील तर तिकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण तुमची मुले-मुली कदाचित अमली पदार्थांच्या आहारी गेलेली असू शकतात...
कटू असले तरी हे सत्य आहे की, गेल्या काही दिवसांत कोल्हापुरातील युवा पिढी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. गेल्या काही दिवसांतील घटना विचारात घेता अत्यंत घातक अशा या अमली पदार्थांनी कोल्हापूर परिसरात चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. नशेसाठी युवा पिढी केवळ अमली पदार्थच नव्हे, तर वेगवेगळ्या औषधांच्या ओव्हरडोसचाही वापर करताना दिसत आहे. इथलेच काही वैद्यकीय व्यावसायिक दाम-दसपट मोबदल्याच्या बदल्यात या नशा बाजाराला हातभार लावताना दिसत आहेत.
कोल्हापुरात फोफावत असलेल्या अमली पदार्थांमध्ये प्रामुख्याने अफू, चरस आणि गांजा यांचा समावेश होतो. अफू गुजरातमधून तर चरस जम्मू-काश्मीरमधून येते. गांजा प्रामुख्याने कर्नाटकच्या सीमावर्ती भागातून येताना दिसत आहे. विदेशी दारूचे दर वाढल्यानंतर तर अनेकांनी दारूचा ग्लास खाली ठेवून चिलमीतून गांजाचे धुरकाट काढायला सुरुवात केल्याचे दिसत आहे.
या अमली पदार्थांची चटक लागलेली व्यक्ती सुरुवातीला काही दिवस सतत उत्साही दिसते. पण नंतर अवघ्या काही दिवसांतच त्या व्यक्तीची झोप व भूक गायब होते, हाडाची काडे होताना दिसू लागतात. कायम चिडचिड, रागावून कुणावरही भडकणे, सततची डोकेदुखी, अचानक रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, ताप येऊन धाप लागणे आणि अचानकपणे अंग गार पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. या अमली पदार्थांच्या आहारी गेलेली व्यक्ती ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.
अमली पदार्थांची ही वाट थेट यमलोकी नेणारी आहे, याची अनेकांना जाणीव नसते. मॅफेड्रॉनचे सलग दोन-चार डोस घेतले की, ती व्यक्ती त्या व्यसनाच्या अधीन होते. एकदा का त्याची चटक लागली की, या व्यसनाच्या आहारी गेलेल्यांच्या डोसचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाते आणि अवघ्या दोन वर्षांच्या आत ती व्यक्ती मृत्यूच्या दारात पोहोचते. तेव्हा सावधान! आपली लेकरं-बाळं या मृत्युपंथावर तर वाटचाल करीत नाही ना, याची सर्वांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
कोल्हापूर शहर आणि परिसरात अमली पदार्थ पुरवठा करणारे अनेक अड्डे निर्माण झालेले दिसतात. सांगली आणि इस्लामपूर रोडवरील काही हॉटेल्स आणि ढाबे, विद्यापीठ परिसरातील काही हॉटेल्स आणि ढाबे, काही पानटपर्या, काही मेडिकल स्टोअर्स आदी ठिकाणी वेगवेगळ्या नावाने या अमली पदार्थांची विक्री सुरू असलेली दिसते. त्यामुळे हे अड्डे आधी उद्ध्वस्त करण्याची गरज आहे.
हेरॉईन, ब्राऊन शुगर, सिंथेटिक ड्रग्ज, केटामाईन, मॅफेड्रॉन, एम्फेटामाईन, कॅथिनॉन या अमली पदार्थांची आजपर्यंत केवळ नावे ऐकायला मिळत होती. पण आजकाल यापैकी बहुतांश अमली पदार्थ कोल्हापुरात सहजासहजी उपलब्ध होताना दिसत आहेत. पावडर, गोळ्या, द्रवरूप, वायुरूप आणि इंजेक्शनच्या रूपात हे अमली पदार्थ मिळतात. मात्र त्याच्या किमती चार ते पाच हजार रुपयांच्या घरात असल्याने हे अमली पदार्थ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे ठरतात. पण उच्चभ्रू वर्गातील अनेक युवक या महागड्या अमली पदार्थांचा शौक करताना दिसतात.
सर्वसामान्य समाजातील आणि खेड्या-पाड्यातील युवा पिढी मोठ्या प्रमाणात मॅफेड्रॉन या अमली पदार्थांच्या जास्त आहारी जात असलेली दिसत आहे. या भागात आलेल्या परप्रांतीयांकडून मॅफेड्रॉन सहज उपलब्ध होते. शिवाय शंभर रुपयांपासून याच्या किमती सुरू होत असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील युवकालाही ते परवडू शकते. दुसरी बाब म्हणजे शंभर रुपयांच्या मॅफेड्रॉनची नशा चार-पाच दिवस पुरते, म्हणजे पुन्हा स्वस्तात मस्त. ही नशा कुणाला ओळखू येऊ शकत नसल्याने महाविद्यालयात, कामाच्या ठिकाणी, सभा-समारंभात कुठेही त्याची चव चाखता येते. त्यामुळे अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या युवकांमध्ये आजकाल मॅफेड्रॉनला पहिली पसंती दिसत आहे.