महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील नडगाव येथे वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
राहुल वसंत पाटील (वय 29, मूळ रा. कळंकवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, सध्या रा. बापटनगर, बिरवाडी) आणि अनुष्का जालिंदर मानकर (25, मूळ रा. येडे मच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. लक्ष्मीनगर, बिरवाडी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
शनिवारी मध्यरात्री हे दोघे दुचाकी (एम.एच. 09 डीडी 8374) वरून महाडकडून बिरवाडीकडे जात होते. मध्यरात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास नडगाव हद्दीत मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती महाड एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.