कोल्हापूर : गांधीनगर येथील एका व्यापार्याच्या घरासमोर पार्क केलेल्या टेम्पोची काच फोडून तब्बल एक कोटी 90 लाख रुपयांची रोकड लंपास करणार्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह लक्षतीर्थ वसाहत आणि बुधवार पेठ परिसरातील चार जणांना अटक करण्यात आली असून अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 78 लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे व्यापार्याकडे कामाला असलेल्या एका कामगारानेच मित्रांच्या मदतीने महिनाभरापूर्वी या धाडसी चोरीचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
या टोळीतील एक संशयित स्वरूप संजय शेळके (25, रा. लक्षतीर्थ वसाहत) प्रकाश वाधवाणी यांच्या फर्ममध्ये कामाला होता. फिर्यादी कैलास गोरड हे वाधवाणी यांचे व्यावसायिक मित्र असल्याने गोरड आणि वाधवाणी यांच्या आर्थिक उलाढाली आणि रोकड ठेवण्याच्या ठिकाणांची स्वरूपला खडान्खडा माहिती होती. याच माहितीचा फायदा उचलत त्याने टोळीचा म्होरक्या योगेश किरण पडळकर (30, रा. लक्षतीर्थ वसाहत) याला टीप दिली. सुमारे महिनाभरापूर्वी राजेंद्रनगर येथील अल्पवयीन संशयिताच्या घरी साथीदारांसोबत बैठक घेऊन चोरीचा कट रचण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी टेम्पो गांधीनगर येथे आल्याची माहिती मिळताच स्वरूप शेळकेने आपल्या साथीदारांशी संपर्क साधला आणि मध्यरात्री चोरी करण्याचा बेत निश्चित केला.
शुक्रवारी (दि. 13) मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आरोपी मोपेडवरून गांधीनगरला पोहोचले. त्यांनी आपली मोपेड रेल्वे पटरीलगत पार्क केली आणि तेथून ते गुडलक स्टेशनरीच्या पत्र्याच्या कंपाऊंडजवळ गेले. अत्यंत शिताफीने त्यांनी कंपाऊंडचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोची काच फोडून डॅशबोर्डजवळील कप्प्यात ठेवलेली 1 कोटी 90 लाख रुपयांची रोकड एका पांढर्या रंगाच्या पोत्यात भरून लंपास केली.
गांधीनगरसारख्या गजबजलेल्या व्यापारी पेठेत घडलेल्या या धाडसी चोरीच्या घटनेने खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाला समांतर तपासाचे निर्देश दिले. सहायक पोलिस निरीक्षक संतोष गळवे व जालिंदर जाधव यांची स्वतंत्र पथकेही तपासासाठी नियुक्त केली होती.
परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. यातूनच टोळीचा म्होरक्या योगेश पडळकर याची माहिती पोलिसांना मिळाली. फिर्यादी कैलास गोरड यांचे मित्र वाधवाणी यांच्याकडे काम करणारा स्वरूप शेळके याच्या संशयास्पद हालचालींवरही पोलिसांचे लक्ष होते. तपासाअंती टोळीतील अल्पवयीन मुलासह पाचजणांची नावे निष्पन्न झाली. हॉकी स्टेडियम परिसरात सापळा रचून पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संशयितांनी सुरुवातीला रकमेबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
मुख्य सूत्रधार योगेश पडळकर याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीतील रक्कम मंगळवार पेठेतील स्वयम सावंत ऊर्फ गोट्या याच्या खोलीत लपवून ठेवल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे संतोष गळवे आणि जालिंदर जाधव यांच्या पथकाने तत्काळ मंगळवार पेठेतील खोलीवर छापा टाकून 1 कोटी 78 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. उर्वरित 12 लाख रुपयांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी फिर्यादी कैलास गोरड यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताना 50 लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे म्हटले होते. मात्र तपासात टेम्पोमध्ये प्रत्यक्षात 1 कोटी 90 लाख रुपयांची रक्कम असल्याचे उघड झाले आहे. हस्तगत केलेल्या 1 कोटी 78 लाख रुपयांव्यतिरिक्त उर्वरित रकमेबाबत आणि एकूण रकमेच्या स्रोताबाबत पडताळणी सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात सम्राटनगर येथील उद्योजक राजीव पाटील यांच्या बंगल्यातून 44 तोळे दागिन्यांसह लाखोंची रोकड चोरीला गेली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेचा कटही पाटील यांच्याच एका कामगाराने रचल्याचे उघड झाले होते. आता गांधीनगर येथील चोरीचा कटही व्यापार्याकडे काम करणार्या कामगारानेच मित्रांच्या मदतीने रचल्याचे समोर आल्याने कर्मचार्यांकडून होणार्या अशा विश्वासघाताच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास सुरू असून पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र कळमकर, संतोष गळवे आणि जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथके तपास करत आहेत.