हातकणंगले; पुढारी वृत्तसेवा : विद्युत डांबावरील विजेचा शॉक बसल्याने संभाजी किशोर रावळ ( २४ रा . फुलेनगर , कोल्हापूररोड कबनूर) याचा मृत्यू झाला. ही घटना लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये सोमवारी (दि. १६) सकाळी घडली. घटनेची नोंद हातकणंगले पोलीसात झाली. संबधीत कारखानदार व मक्तेदार यांच्या बेफिकीरपणामुळेच संभाजी रावळचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.
हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये सारडा,राठी , शिरगांवे व जिरवाणी यांच्या कारखान्यातील विजेचे काम सुरू होते. या कामाचा ठेका शिवाजी केसरे, सोमनाथ केसरे, शाहू पवार व शशिकांत पाटील यांनी घेतला होता. या मक्तेदारांकडे संभाजी कामास होता. तो सोमवारी (दि. १६) सकाळी विद्यूत खांबावरील काम करण्यासाठी खांबावर चढला. यावेळी त्याच्याकडे संरक्षक उपकरणे नव्हती. तो खांबावर चढताच त्याला विद्युत तारेचा जोराचा झटका बसताच खाली कोसळला. तात्काळ त्याला उपचारासाठी इचलकरंजी येथे नेण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह इचलकरंजी येथील आय.जी.एम रुग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी संभाजीच्या नातेवाईकांनी कारखानदार व मक्तेदार यांच्या निष्काळजीपणामुळे संभाजीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबधीतावर कारवाई करावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने गोंधळ झाला.
ही घटना हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने नातेवाईकांनी तक्रार दिल्यास संबधीतांवर तक्रार दाखल केली जाईल अशी ग्वाही हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी दिल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला .परंतु मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला न०हता .