Kolhapur News : कुस्तीपंढरीत महिलांच्याही मानधनधारक कुस्त्यांची गरज file photo
कोल्हापूर

Kolhapur News | कुस्तीपंढरीत महिलांच्याही मानधनधारक कुस्त्यांची गरज

जिल्ह्यात ६०० च्या वर मुलींचा सराव : महागड्या खेळात करिअरसाठी मल्लांची कसरत

मोहन कारंडे

मोहन कारंडे : पुढारी ऑनलाईन

कुस्तीपंढरी कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांच्या वतीने मानधनधारक कुस्त्या घेण्यात येत आहेत. मानधनच्या फितीतून मिळणाऱ्या पैशाचा पैलवानांना खुराकासाठी हातभार लागतो. मुलांच्या बरोबरच सध्या जिल्ह्यात ६०० च्या घरात मुलीही सराव करत आहेत, पण मुलींच्या कुस्तीसाठी मात्र कोणी प्रयत्नशील नसल्याचे चित्र असताना कुंभी साखर कारखान्याने पहिल्यांदाच कार्यक्षेत्रातील मुलींसाठी मानधनधारक कुस्ती स्पर्धा घेतली. त्यामुळे अशाप्रकारे मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी मानधनधारक कुस्त्या घेण्याची मागणी महिला कुस्तीपटूंसह पालकवर्गातून होत आहे.

महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ असलेल्या कुस्तीची पंढरी म्हणून करवीर नगरीची ओळख आहे. कोल्हापूर कुस्तीचे माहेरघर जरी असले तरी कुस्त्या खेळणारी ९० टक्के मुलं गरीब शेतकरी कुटुंबातली असतात. कुणीच शिकल्या सवरलेल्या घरातले नसतात, पण एकीकडे कुस्तीचे वेड आणि दुसरीकडे घरातील दारिद्रय या सगळ्यांमध्ये हाताच्या बोटावर मोजावे इतकेच पैलवान खेळात पुढे जातात; तर बाकीचे कुस्ती मध्येच सोडून कामधंदा बघत जीवन व्यतीत करतात. उदयोन्मुख क्रिकेटपटू वर्षातून चार महिने सराव करत असतील, पण पैलवानांसाठी २० वर्षांची तालीमही कमीच असते. आपल्या पोरांना कुस्ती शिकवा, म्हणून तालमीत वस्तादांच्या विनवण्या करून वडिलांनी तालमीमध्ये घातलेले असते. त्यामुळे एकीकडे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड तर दुसरीकडे मात्र खुराकसाठी पैशांची चणचण, अशा दुहेरी संकटात पैलवान गुरफटले जातात. अशावेळी मानधनधारक कुस्त्यांच्या फितीतून चांगला खुराक घेण्यासाठी काहीशी मदत होते.

'कुंभी' वर पहिल्यांदाच मुलींच्या मानधनधारक कुस्ती स्पर्धा

कुंभी-कासारी साखर कारखान्याने मात्र गेल्या ३३ वर्षांपासून पैलवानांना पाठबळ देण्याची परंपरा कायम जपली आहे. येथे कार्यक्षेत्रातील मुलांसाठी कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने मानधनधारक कुस्त्या घेतल्या जातात. यामध्ये २५ किलोपासून ८४ किलो वजन गटापर्यंतच्या तसेच ओपन गटातील प्रथम क्रमांकाच्या मल्लांना मासिक मानधन दिले जाते. या मानधनामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील नवोदित व होतकरू पैलवानांना खुराकसाठी मदत होते. मानधनातून मिळणाऱ्या पैशात खुराकाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागतो. कुंभीबरोबरच शाहू कारखान्याच्या वतीनेही कार्यक्षेत्रातील विविध खेळातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विजेत्या खेळाडूंना मानधन दिले जाते. दरम्यान, या वर्षी पहिल्यांदाच कुंभी कारखान्याने मुलींच्या मानधनधारक कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये ३० हून अधिक मुलींनी सहभाग नोंदवला. या स्पर्धा २० किलोपासून ते ६० किलो वजन गटापर्यंत पार पडल्या. या स्पर्धेमुळे महिला कुस्तीपटुंना मोठे पाठबळ मिळणार असल्याचे राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे प्रशिक्षक (NIS Coach) संदीप पाटील यांनी सांगितले.

कुडित्रे : कुंभी-कासारी साखर कारखान्याने आयोजित केलेल्या मुलींच्या कुस्ती स्पर्धेतील एक क्षण

कोल्हापुरातील अनेक मुलींचा पुण्यात सराव 

सध्या जिल्ह्यातील कितीतरी मुली आपापल्या गावामध्ये सराव करत असून काही मुली कोल्हापूर, पुणे येथेही कुस्तीचे बाळकडू घेत आहेत. मुलांप्रमाणे मुलीही कुस्तीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालत आहेत. पण या मुलींना मदतीची गरज आहे. कुंभी कासारी साखर कारखान्याप्रमाणेच इतरही कारखाने व संस्थांच्या वतीने मानधनधारक कुस्त्या घेऊन कोल्हापूर या कुस्ती पंढरीतील पैलवानांची खाण अबाधित ठेवण्यास हातभार लावण्याची गरज आहे. जिल्ह्यातील अनेक मुली ऑलिम्पिकचे स्वप्न रंगवत आहेत. अशा मुलींसाठी मानधनधारक कुस्त्या एक नवी आशा बनू शकते. त्यामुळे मुलांप्रमाणे मुलींच्याही मानधनधारक कुस्त्या घेण्याची गरज आहे.

महिला कुस्तीपटू घडवण्यासाठी प्रशिक्षण कुस्ती केंद्रांची कमतरता

कुस्तीची पंढरी कोल्हापूर असली, तरी भावी पिढीतील महिला कुस्तीपटू घडवण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांची कमतरता आहे. जिल्ह्यात सदाशिवराव मंडलिक आखाडा मुरगूड व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर या दोन ठिकाणी मुलींसाठी प्रशिक्षण कुस्ती केंद्र आहेत, पण सध्या महिला कुस्तीपटूंची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यात आणखी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT