अनुराधा कदम
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकर्यांनी पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडून कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोगांची ‘पेरणी’ केली आहे. सेंद्रिय गांडूळ खतनिर्मिती, उन्हाळी नाचणीची लागवड, ड्रिप सिंचनसह मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर आणि सौरऊर्जेच्या साहाय्याने प्रयोगशील शेती करण्यात महिलांचा सहभाग सक्रिय वाढत आहे. महिला शेतकर्यांचा टक्का वाढत असून, जिल्ह्यातील जवळपास 63 हजार महिलांनी नवशेतीची कास धरली आहे, तर दीड लाख महिलांनी बचट गटांद्वारे कृषिपूरक उद्योगात झेप घेतली आहे.
जिल्ह्यातील पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, हातकणंगले, कागल, करवीर या तालुक्यांत शेतीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. स्थानिक पीक उत्पादन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, शेती पिकांचे व्यवस्थापन, विक्री नियोजन याचीही धुरा महिलांच्या खांद्यावर आहे. शेतीसाठी नैसर्गिक ऊर्जास्रोतांकडे महिला शेतकर्यांचा वाढता कल आहे. सेंद्रिय खत, पोषणमूल्य असलेली धान्ये, कमी खर्चात पाणी व्यवस्थापन वापरून स्वतःचे आर्थिक आणि सामाजिक स्थान बळकट केले आहे.
गोंडोली येथील सुवर्णा पाटील यांनी आपल्या केवळ अडीच एकर शेतीत गांडूळ खत प्रकल्प सुरू केला. त्यांच्या प्रकल्पातून दरमहा 150 गोण्या गांडूळ खत विकले जात आहे. विजया माळी यांनी घरच्या शेणखताचा उपयोग करत गांडूळ खत तयार करण्यास सुरुवात केली. या खताला कोल्हापूरसह कर्नाटक, गोवा व गुजरातमध्ये बाजारपेठ मिळवली असून, वर्षाला सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात त्यांनी स्थानिक महिलांना सामावून घेतले असून, त्यांच्या बचत गटातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.
डोंगराळ आणि अतिपर्जन्य प्रदेशात नाचणीचे उत्पादन खरिपात मर्यादित होते. मात्र, करवीर तालुक्यातील महिलांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळी हंगामात नाचणीची लागवड करून दुप्पट उत्पादन मिळवले. यामुळे पोषणमूल्यांनी समृद्ध असलेली नाचणी बाजारात वर्षभर उपलब्ध होऊ लागली आहे. भाजीपाला लागवडीतही महिला आघाडीवर आहेत. पन्हाळा तालुक्यातील काही महिला शेतकर्यांनी 30 गुंठा क्षेत्रात काकडीची लागवड केली आहे. मल्चिंग पेपरचा वापर, ड्रिप सिंचन आणि सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनात वाढ झाली. अवघ्या 45 दिवसांत त्यांनी सव्वा लाख रुपये निव्वळ नफा मिळवला.