आशिष शिंदे
कोल्हापूर : कोल्हापुरात यंदा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सूर्य आग ओकू लागल्याने पारा 35 अंशांपर्यंत जात आहे. मार्च महिन्यापर्यंत उन्हाचा तडाखा जाणवणार असला, तरी यंदाचा उन्हाळा गतवर्षीच्या तुलनेत काहीसा दिलासादायक असेल, अशी शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत यंदाचा उन्हाळा सरासरीपेक्षा थंड राहील आणि कमाल तापमान उष्णतेच्या लाटेच्या निकषांपेक्षा खालीच असेल. पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता अत्यंत कमी असून, संपूर्ण हंगामात फार तर एकदाच तापमान या टप्प्यापर्यंत पोहोचू शकते. परिणामी, यावर्षी उन्हाळ्यात नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून मोठा दिलासा मिळेल. मात्र, एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण उन्हाळ्यात केवळ 1 ते 2 उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता असून, त्या प्रामुख्याने मार्च महिन्यातच जाणवतील. मार्च हा उन्हाळ्यातील सर्वात कोरडा महिना असला, तरी या महिन्याच्या उत्तरार्धात काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात होऊ शकते. उन्हाळ्याचा कडाका कमी असला, तरी यंदा अवकाळी पावसाचा जोर मात्र अधिक असणार आहे. विशेषतः, एप्रिल महिना अतिपावसाचा ठरेल; या काळात सरासरीपेक्षा जास्त अवकाळी पावसाची आणि गडगडाटी वादळांची शक्यता आहे. तसेच, जोरदार वादळी वार्यांसह काही ठिकाणी गारपीट होण्याचाही धोका आहे. मे महिन्यातही पावसाची हजेरी असेल; मात्र त्याचे प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा कमी राहील. सद्यस्थितीतील अंदाजानुसार, सुदैवाने मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोणत्याही चक्रीवादळाचा धोका नाही.
यामुळे उन्हाळा कूल राहणार?
यंदा उन्हाळ्याची तीव—ता कमी राहण्यामागे अरबी समुद्रावरून येणारे वारे आणि हवामानातील बदल मुख्यत्वे कारणीभूत आहेत. हवामानतज्ज्ञांच्या मते, पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्स) आणि अरबी समुद्रावरून पश्चिमेकडून राज्याकडे सलग वाहणारे थंड आणि बाष्पयुक्त वारे तापमानावर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. यावर्षी जेट स्ट्रीम कमकुवत राहण्याची शक्यता असल्याने आणि अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प जमिनीकडे खेचले जाणार असल्याने उष्णतेची लाट तयार होण्यास नैसर्गिकरीत्या अटकाव होईल. या अनुकूल हवामान प्रणालीमुळे वातावरणात आर्द्रता थोडी वाढलेली जाणवेल; मात्र त्यामुळे असह्य चटका न वाढता उन्हाळ्यातील बहुतांश काळ तापमान सरासरीइतके किंवा त्यापेक्षा कमी राहील.