कोल्हापूर : प्रत्येक प्रभागातील समस्य वेगळ्या आहेत. शहराचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे समजून घेत आम्ही सात दिवसांत जाहीरनामा प्रसिद्ध करू. ‘कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं’ ही टॅगलाईन असणार आहे, असे आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आल्यास टक्केवारी आणि खड्डेमुक्त कोल्हापूर करणार असल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या वतीने लवकरच जनतेच्या मनातला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांकडून शहरातील प्रश्न मागविण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ मंगळवारी खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. पाटील म्हणाले, जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी आतापर्यंत सहा-सातवेळा चर्चा झाली आहे. आता जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून येत्या दोन-तीन दिवसांत ती पूर्ण होईल. शिवसेनेच्या जागांबाबत शिक्कामोर्तब होईल. दि. 1 जानेवारीपासून आघाडीचे उमेदवार अर्ज भरण्यास सुरुवात करतील.
आमची गाडी भरलेली आहे
काँग््रेासकडून 400 उमेदवारी मागणीचे अर्ज नेले आहेत. इच्छुकांची संख्या आमच्याकडेच जास्त आहे. त्यामुळे आमची गाडी आता भरलेली आहे. आयारामांना उमेदवारी देण्याचा प्रश्नच नाही. भाजपमध्ये मात्र आता निष्ठावंत, जुन्या कार्यकर्त्यांना शोधावे लागत आहे. भाजपचे जुने कार्यकर्ते अडगळीतच आहेत. ही वस्तुस्थिती त्यांच्या पक्षातून आता व्यक्त होऊ लागली आहे. माजी आमदार मालोजीराजे आमच्या सोबतच आहेत. इच्छुकांचे उमेदवारी अर्ज आम्ही एकत्रितच भरून घेणार आहोत, त्यामुळे बंडखोरी होणार नाही.
यावेळी खा. शाहू महाराज यांच्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, बाळासाहेब सरनाईक, दुर्वास कदम, आनंद माने, सरलाताई पाटील, भारती पोवार आदी उपस्थित होते.