कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींवर कोणाची सत्ता? याचा फैसला रविवारी (दि. 21) होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यानंतर अवघ्या तास-दीड तासातच सर्व निकाल जाहीर होणार आहेत. सर्वच नगरपरिषदा, नगरपंचायतींत महायुती, महाविकास आघाडीत झालेल्या बिघाड्या, त्यातून टोकाला गेलेला संघर्ष, त्यामुळे निर्माण झालेली ईर्ष्या आणि त्यातून चुरशीने झालेले मतदान, यामुळे अवघ्या काही तासांवर आलेल्या या मतमोजणीबाबतची उत्सुकता आणि धाकधूक वाढत चालली आहे.
जिल्ह्यातील जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ, हुपरी, कागल, गडहिंग्लज, मुरगूड, वडगाव, पन्हाळा आणि मलकापूर या 10 नगरपरिषदा आणि हातकणंगले, आजरा व चंदगड या 3 नगरपंचायतींसाठी दि. 2 डिसेंबर रोजी ईर्ष्येने सरासरी 78.67 टक्के इतके मतदान झाले होते. नगराध्यक्षपदाच्या एकूण 13 जागांसह 263 नगरसेवक म्हणून विजयाची माळ मतदार कोणाच्या गळ्यात टाकतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मुरगूड, मलकापूर, पन्हाळा, आजरा आणि चंदगडची मतमोजणी अवघ्या अर्ध्या तासांतच पूर्ण होईल. उर्वरित नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी तासाभरातच पूर्ण होईल. कागलची मतमोजणी सहा टेबलवर, तर हुपरीची मतमोजणी 5 टेबलवर होईल, तिथे प्रत्येकी 7 फेर्या होणार आहेत. जयसिंगपूरसाठी 13 टेबलवर पाच फेर्यांत मतमोजणी होणार आहे. गडहिंग्लजच्या 11 टेबलवर चार फेर्या होणार आहेत. शिरोळच्या 11 टेबलवर, वडगाव आणि कुरुंदवाडच्या प्रत्येकी दोन टेबलवर, मतमोजणीच्या तीन फेर्या होणार आहेत. हातकणंगलेसाठी 7 टेबलवर मतमोजणी होणार असून, तीन फेर्यांत मतमोजणी पूर्ण होणार आहे. मुरगूडमध्ये 6 टेबलवर, मलकापुरात 5 टेबलवर, आजर्यात 10 टेबलवर, तर चंदगडची 9 टेबलवर मतमोजणीच्या प्रत्येकी दोन फेर्या होणार आहेत.
गडहिंग्लजच्या एका प्रभागासाठी आज मतदान
गडहिंग्लज नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 अ साठी शनिवारी (दि. 20) मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत 2,479 मतदार तीन मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.