अनुराधा कदम
कोल्हापूर : पन्नास वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात ‘श्रावण येतोय’ हे सांगायला कोणत्या पंचांगाची गरज नव्हती. आभाळाची बदललेली ठेवण, पहाटेच्या धुक्याची पांढरी शाल, शिवारावर पसरलेली हिरवी चादर आणि ओल्याशार काळ्या मातीचा दरवळच श्रावणाची चाहूल देत असे. पन्हाळ्याच्या डोंगरमाथी धुके उतरले, गगनबावड्याच्या घाटवाटांवर पावसाच्या सरी झडू लागल्या, राधानगरीच्या जंगलातून ओल्या पानांचा गंध दरवळला आणि पंचगंगेला पावसाने नवा वेग दिला की मन आपोआप म्हणायचे... श्रावण दाराशी आला. आताही श्रावण तोच आहे. पण काळ बदलला, उत्सव बदलले, माणसांच्या जगण्याची लय बदलली तरी कोल्हापूरच्या मातीला भिजवणारा श्रावण आजही तितकाच हिरवा आहे.
तेव्हा श्रावण आधी शिवारात उतरत असे आणि मग घराच्या उंबरठ्यावर. गावाकडची घरे सारवली जायची, अंगणात सडा पडायचा, देवघरातली समई उजळायची. सणांच्या पावलांनी श्रावण घराघरांत यायचा. नागपंचमी, मंगळागौरीच्या रात्री तर गावाेगावची अंगणेही फेर धरायची. झिम्म्याचा ताल, फुगड्यांच्या गिरक्या ओव्यांमधील जगण्याचे सूर यातून श्रावण गहिरा व्हायचा. पंचमीच्या रात्रीचे हास्य, त्या फुगड्या, त्या गप्पा आणि त्या ओल्या अंगणांचा गंध मनाच्या कप्प्यात आयुष्यभर जपला जायचा. तो केवळ महिना नव्हता, तो घराचा, शिवाराचा आणि माणसामाणसांतील नात्यांचा उत्सव होता.
आजचा श्रावण नव्या लयीत येतो. बाजारपेठेत 'श्रावण स्पेशल' साड्या सजतात, हिरव्या बांगड्या आणि पारंपरिक दागिन्यांना मागणी वाढते, उपवासाच्या पदार्थांना नवे रूप मिळते. मंगळागौरीचे कार्यक्रम नव्या उत्साहाने होतात. हिरव्या साडीतील फोटो सोशल मीडियावर झळकतात. पन्हाळ्याचे धुके, गगनबावड्याचा पाऊस, राधानगरीची हिरवाई आणि कोल्हापूरच्या पावसाळी वाटा कॅमेऱ्यातून जगभर पोहोचतात. पूर्वी श्रावण मनात साठवला जायचा, आता तो मनासोबत मोबाईलमध्येही साठवला जातो.
श्रावण सरी त्याच आहेत... मातीचा गंध, पंचगंगेची ओलावा, निसर्गाचा बहर तोच आहे, अंबाबाई मंदिरातील भक्तीचा गजर तोच आहे, गावे, पेठांमधील सांस्कृतिक बाज तोच आहे, सण-उत्सवांचा उत्साह तोच आहे, कोल्हापूरच्या हिरव्या शिवारावर विसावणारे आभाळही तेच आहे फक्त बदलले आहेत ते श्रावणाच्या आगमनाचे, स्वागताचे आयाम. म्हणूनच आजही श्रावणाची सर आधी मनापर्यंत पोहोचते. कारण कोल्हापूरचा श्रावण हा केवळ ऋतू नाही, तो पाऊस, माती, हिरवाई, भक्ती, परंपरा, आठवणी आणि नव्या पिढीच्या उत्साहाला जोडणारा हिरवा धागा आहे. श्रावणाच्या स्वागताचे केवळ रूप बदलले आहे. परंपरेला आधुनिकतेची सोबत मिळाली आहे. माध्यमे बदलली, पण श्रावणाशी जोडलेले भावबंध बदललेले नाहीत. श्रावण कुठेच हरवलेला नाही तर तो फक्त प्रत्येक पिढीच्या मनात नव्या रंगाने उमलला आहे.