कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने रात्री व पहाटे कोल्हापूरकरांना हुडहुडी भरविणारी थंडी जाणवत आहे. शनिवारी पहाटे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. किमान तापमान 15.8 अंशांपर्यंत घसरले असून, दैनंदिन सरासरीत 2.7 अंशांची घट झाली आहे. शहरासह जिल्ह्यात सकाळी धुक्याची दुलई पाहायला मिळाली. हवामान विभागाने मंगळवार (दि. 18) पर्यंत थंडीची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
शहरात गेल्या आठवडाभरापासून थंडीच्या तीव्रतेत चढ-उतार होत आहेत. सात दिवसांपूर्वी किमान तापमान 16 अंशांच्या आसपास होते. यानंतर पारा 19 अंशांपर्यंत वाढल्याने थंडी कमी जाणवत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तापमानात घसरण झाल्याने थंडीचा जोर वाढला आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून शहरात अचानक गारवा पसरला. रात्रभरात तापमानात घसरण झाल्याने शनिवारी पहाटे थंडीचा कडाका जाणवत होता. दैनंदिन कमाल तापमानातही 1.2 अंशाची घसरण होऊन पारा 28.8 अंशांवर स्थिरावला. सापेक्ष आर्द्रता 45 टक्क्यांपर्यंत कमी झाली असल्याने, थंडी अधिक जाणवत आहे.