आशिष शिंदे
कोल्हापूर : राज्यभरात पाऱ्याने उसळी घेतली आहे. कोल्हापुरातही उष्णतेचा कहर सुरू आहे. ‘हीट इंडेक्स’ पिवळ्या श्रेणीत गेला आहे. यामुळे कोल्हापूरचे कमाल तापमान 37 ते 39 अंशांच्या घरात असले, तरी प्रत्यक्ष तापमान 40 अंश जाणवत आहे. विदर्भातील अकोला, नागपूरसारख्या शहरांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असले, तरी तेथील आर्द्रता 20 टक्क्यांच्या आसपास असल्याने उष्णता तुलनेने कोरड्या स्वरूपाची आहे. त्याउलट, कोल्हापुरात आर्द्रतेचे प्रमाण 73 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने ‘हीट इंडेक्स’ वाढून असह्य उकाडा आणि घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
कोल्हापुरात तापमान आणि आर्द्रतेतील बदलामुळे नागरिकांना उष्णतेचा दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर आर्द्रता 42 ते 73 टक्क्यांदरम्यान आहे. या दोन्ही घटकांच्या एकत्रित परिणामामुळे शहरातील जाणवणारे तापमान (फील्स लाईक) म्हणजेच हीट इंडेक्स, 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. परिणामी, तापमान कमी असतानाही नारिकांना उष्णतेचा असह्य त्रास जाणवत आहे.
अशी आहे ‘हीट इंडेक्स’ची श्रेणी...
श्रेणी : तापमान : शरीरावर होणारा आघात
मध्यम (27 ते 32) : थकवा जाणवू शकतो
धोकादायक : (32 ते 41) : उष्माघात, स्नायूंमध्ये गोळे येणे, थकवा संभव
अतिधोकादायक : (41 ते 54) : उष्माघात व थकवा येण्याची शक्यता जास्त
अत्यंत घातक : (54 पेक्षा जास्त) : हीटस्ट्रोकचा गंभीर धोका