जयसिंगपूर : वादळी वारा, विजांचा कडकडाट, गारासह पावसाने जयसिंगपूर, शिरोळ, उदगाव, नांदणी, धरणगुत्ती, संभाजीपुरासह परिसरात दीडतास धुमाकूळ घातला. परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले, तर अनेक ठिकाणी झाडे कोसळली. जयसिंगपुरातील लक्ष्मी रोडवर अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
मंगळवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरू झाला. बघता बघता पावसास सुरुवात झाली. त्यामुळे जयसिंगपूर-शिरोळ मार्गावरील झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. परिसरातील अनेक घरांवरचे पत्रे उडाले. नांदणी रोड, लक्ष्मी रोड, सांगली-कोल्हापूर महामार्ग, शाहूनगर आदी भागांत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रस्ते, गटारी तुडुंब भरल्या. सखल भागात पाणी साठले.
बाजारपेठेत तारांबळ
बाजारपेठेत खरेदी विक्रीसाठी आलेल्या नागरिकांची पावसामुळे तारांबळ उडाली. विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनपूर्व पावसामुळे काही अंशी नागरिकांना दिलासा मिळाला.