कोल्हापूर : पाण्याच्या द़ृष्टीने चारही दिशेने सुजलाम् सुफलाम् असलेल्या पंचगंगेच्या कुशीत वसलेल्या कोल्हापूर शहराला टंचाईच्या काळात पाणी पुरविण्यासाठी भाड्याने घेतलेल्या टॅँकरवर 25 लाख रुपयांचा खर्च दरवर्षी महापालिकेला करावा लागत आहे. एखाद्या दुष्काळग्रस्त भागाला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जेवढा खर्च होत नसेल, इतका खर्च शहरात पाणी देण्यासाठी महापालिकेला करावा लागत आहे. महापालिका मालकीच्या चार टँकरच्याही दररोज आठ ते दहा फेर्या वेगवेगळ्या भागात होतच असतात.
शहराला पाणीपुरवठा करणार्या शिंगणापूरच्या दोन्ही पाणी योजना, जुनी बालिंगा, कळंबा योजना असून देखील टॅँकरने पाणी पुरविण्याची आणि त्यावर वारेमाप खचर्र् करण्याची वेळ महापालिकेवर येत असेल तर नक्कीच नियोजनाचा अभाव आहे. शहराच्या तीनही बाजूने पंचगंगा नदी वाहते. पण प्रदूषणाच्या कारणास्तव आता या नदीतून पाणी उपसा करत नाहीत. शहर हद्दीत नदीचा प्रवेश होण्यापूर्वी बालिंगा आणि शिंगणापूर येथून पाण्याचा उपसा केला जातो. याशिवाय कळंबा तलावाचेही पाणी शहरासाठी उपसले जाते.
काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा सुरू होऊन एक वर्ष होऊन गेले. तरीदेखील पाणीपुरवठ्यात फारसा परिणाम झालेला नाही. अनेक भागातून पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. सरासरी पाहिली तरी आठवड्यातून एखाद-दुसरा दिवस पाणीपुरवठा या ना त्या कारणाने बंदच असतो. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात तर सात ते आठवेळा पाणीपुरवठा बंद करण्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर आली होती. अशा काळात भाड्याने टँकर घेतले जातात आणि त्यावर वारेमाप खर्च होतो.
शहराला पाणीपुरवठा करणार्या बालिंगा योजनेसाठी नदीतून बालिंगा उपसा केंद्रापर्यंत दगडी पाटाने पाणी आणले आहे. हा जुना पाट नोव्हेंबर महिन्यात ढासळला. तो पाट रिकामा करण्यासाठी तब्बल आठ दिवस लागले. या काळात शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे टँकर भाड्याने घेऊन पाणीपुरवठा करावा लागला. 2019 आणि 2021 च्या महापुराच्या काळात देखील महापुराचा विळखा बसल्याने पाणी योजना ठप्प होत्या. अधून मधून तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतो. वर्षाकाठी 25 लाख रुपये पाण्याच्या टँकरचे भाडे भरण्याची वेळ महापालिकेवर येते.