कोल्हापूर; सतीश सरीकर : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पंचगंगा नदीवर शिंगणापूर तर भोगावती नदीवर बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रे आहेत. या उपसा केंद्रांतून दररोज सुमारे 198 एम.एल.डी. पाण्याचा उपसा केला जातो. त्यासाठी 24 तास उपसा केंद्रातील पंप आणि इतर मशिनरी पाण्यात असतात. पंपाचे आर्युमान साधारणतः 15 ते 20 वर्षे धरले जाते. मात्र, या केंद्रातील पंप व इतर मशिनरी 25 वर्षांपासून 50 वर्षांपर्यंत जुनी आहेत. अशा 'कालबाह्य' झालेल्या उपसा केंद्रातूनच कोल्हापूरला पाणीपुरवठा केला जात आहे.
त्यामुळे वारंवार मेटेंनन्स करावा लागत असल्याने पंपांची कार्यक्षमता कमी झाली आहे. काळानुसार नवीन मशिनरी घेतल्या नसल्याने त्याचा परिणाम पाणी उपशावर होत आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी वार्षिक सुमारे 30 लाख रु. अंदाजपत्रकात धरण्यात येतात. मात्र, ही रक्कम अत्यल्प आहे. अत्यावश्यक सेवा असूनही वीज गेली तर जनरेटर नाही.