कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना सोमवारी (दि. 21) महावितरणकडून धामणवाडी येथे नियोजित कामामुळे पूर्णपणे बंद राहणार आहे. परिणामी शहराच्या बहुतांश भागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मंगळवारीही पाणीपुरवठा कमी दाबाने आणि विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
महावितरणतर्फे धामणवाडी येथे 33 केव्ही क्षमतेच्या मुख्य वीज वाहिनीचे खांब स्थलांतरित करण्याचे (पोल शिफ्टिंग) काम सोमवारी सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे काळम्मावाडी योजनेचा वीजपुरवठा तब्बल 11 तास खंडित राहील. वीज पुरवठा बंद असल्याने पंपांद्वारे होणारा पाणी उपसा पूर्णपणे थांबणार आहे. याचा थेट परिणाम कोल्हापूर शहर, उपनगरे आणि योजनेवर अवलंबून असलेल्या काही ग्रामीण भागांवर होणार आहे. वीजपुरवठा पूर्ववत होताच पाणी उपसा सुरू केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बालिंगा पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या सी आणि डी वॉर्डातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे.
ए व बी वॉर्ड : पुईखडी, कळंबा फिल्टर हाऊस परिसर, साळोखेनगर, संभाजीनगर स्टँड, नाना पाटील नगर, तपोवन, रामानंदनगर, नाळे कॉलनी, बालाजी पार्क, शाहू कॉलनी, सुभाषनगर, आर. के. नगर, भारती विद्यापीठ परिसर.
ई वॉर्ड : संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल परिसर, ग्रीन पार्क, शांतिनिकेतन, चौगुले हायस्कूल परिसर, सम्राटनगर, इंगळेनगर, कामगार चाळ, अश्विनी नगर, पायमल वसाहत, अंबाई डिफेन्स कॉलनी, जागृती नगर.
कसबा बावडा आणि परिसर : कसबा बावडा, लाईन बझार, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडिक वसाहत, रुईकर कॉलनी, सदर बाजार, जाधववाडी, बापट कॅम्प.
शहरातील इतर प्रमुख भाग : ताराबाई पार्क, नागाळा पार्क, रमणमळा, मार्केट यार्ड, साईक्स एक्स्टेंशन, न्यू शाहूपुरी, शाहूपुरी 1 ते 4 गल्ली, टेंबलाईवाडी, पाच बंगला, व्हीनस कॉर्नर, बी. टी. कॉलेज परिसर.