Kalamwadi Dam Water Level
कसबा बावडा : अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा लक्षणीयरीत्या घटला आहे. यामुळे काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. परिणामी शहराला या योजनेतून पाणीपुरवठा करणे शक्य नाही, असे कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. मात्र उपलब्ध जलस्रोतांची मर्यादित क्षमता आणि नदीतील पाणीपातळी लक्षात घेता शहर व उपनगरांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शनिवारी (दि. १३) पासून लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, रविवार पेठ, भवानी मंडप परिसर, फुलेवाडी रिंगरोड, नृसिंह कॉलनी तसेच संबंधित ग्रामीण भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
रविवार (दि. १४) पासून महाद्वार रोड परिसर, रंकाळा, ब्रह्मपुरी, दुधाळी, पंचगंगा रोड, सिद्धार्थनगर, राजेसंभाजी नगर, कणेरकरनगर आणि तुळजाभवानी परिसरात ही अंमलबजावणी सुरू होईल.
पुईखडी व कसबा बावडा फिल्टर हाऊसअंतर्गत येणाऱ्या राजारामपुरी, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, कावळा नाका, बावडा, कदमवाडी, लाईनबाजार, सदर बाजार आदी भागांनाही या नियोजनाचा फटका बसणार आहे.
महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.