कोल्हापूर

Kolhapur Water Crisis : कोल्हापूर महानगरपालिकेला पाणीपुरवठा बंद, १७० कोटींच्या थकबाकीमुळे पाटबंधारे विभागाचा दणका

कोल्हापूरकरांवर संकट; ऐन उन्हाळ्यात बालिंगा पंपिंग स्टेशनला ठोकले टाळे

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात कोल्हापूर शहरावर भीषण जलसंकट ओढवले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा प्रशासकीय कारवाईमुळे खंडित झाला आहे. तब्बल १७० कोटी रुपयांची पाणीपट्टी थकवल्यामुळे पाटबंधारे विभागाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत बालिंगा पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा बंद केला आहे. या कारवाईमुळे कोल्हापूरकरांमध्ये एकच खळबळ उडाली असून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.

थकबाकीचा डोंगर आणि प्रशासकीय अनास्था

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेकडे गेल्या अनेक वर्षांपासूनची पाणीपट्टी थकीत आहे. पाटबंधारे विभागाच्या दप्तरी असलेल्या नोंदीनुसार, निव्वळ पाणीपट्टी ६५ कोटी रुपये, ६३ कोटींचा लोकल सेस, ५९ कोटींची दंडनीय आकारणी आणि २८ कोटींचे विलंब शुल्क अशी मिळून एकूण १६५ ते १७० कोटी रुपयांची प्रचंड थकबाकी आहे. या थकबाकी संदर्भात पाटबंधारे विभागाने महापालिकेला वारंवार नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून या नोटिसांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर ही टोकाची कारवाई करण्यात आली आहे.

कुलूपे तोडून केली कारवाई

आज सकाळच्या सुमारास पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी बालिंगा पंपिंग स्टेशनवर धडकले. कारवाईची कुणकुण लागताच महापालिकेचे तिथे उपस्थित असणारे कर्मचारी गायब झाले होते आणि पंपिंग रूमला कुलूपे लावण्यात आली होती. मात्र, पाटबंधारे विभागाने कोणतीही तमा न बाळगता ही कुलूपे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मुख्य स्विच बंद करून संपूर्ण पाणीपुरवठा थांबवला. इतकेच नव्हे तर पंपिंग स्टेशनला आता स्वतःची कुलूपे लावून ते सील करण्यात आले आहे.

नागदेवाडीवरही कारवाईची टांगती तलवार

बालिंगा पंपिंग स्टेशन बंद केल्यानंतर आता पाटबंधारे विभागाचा मोर्चा नागदेवाडी पंपिंग स्टेशनकडे वळला आहे. हे स्टेशनही लवकरच सील केले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. महापालिका प्रशासनाने जर तातडीने यावर तोडगा काढला नाही, तर येत्या काही तासांत कोल्हापूरकरांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होणार आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, महापालिकेने ही थकबाकी का भरली नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT