कोल्हापूर

Kolhapur voting news | बुबनाळमध्ये ९० वर्षांच्या आजींनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क

तरुण मतदारांना लाजवणारा उत्साह; इंदुबाई शहापूरे यांचे समाजासमोर आदर्श पाऊल

पुढारी वृत्तसेवा

कवठेगुलंद : शिरोळ तालुक्यातील बुबनाळ येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान लोकशाहीचा खरा उत्साह पाहायला मिळाला. वाढत्या वयाची तमा न बाळगता, बुबनाळ येथील ९० वर्षीय आजी इंदुबाई आप्पासो शहापूरे यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या या जिद्दीने केवळ प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले नाही, तर मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

तालुक्यात आज सकाळी ७ वाजेपासूनच मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. बुबनाळ येथील केंद्रावर सकाळच्या सत्रात इंदुबाई शहापूरे या आजींचे आगमन झाले. वाढत्या वयामुळे त्यांना चालणे कठीण असल्याने, निवडणूक प्रशासनाच्या वतीने त्यांच्यासाठी चारचाकी वाहन आणि व्हिलचेअरची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या सोयीचा लाभ घेत आजींनी केंद्रावर जाऊन मतपेटीत आपले मत नोंदवले.

तरुणांसाठी प्रेरणादायी पाऊल आजच्या धावपळीच्या युगात अनेकदा तरुण मतदार मतदानाच्या दिवशी सुटीचा आनंद घेतात किंवा केंद्रावर जाण्यास कंटाळा करतात. अशा परिस्थितीत, ९० व्या वर्षीही लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणाऱ्या इंदुबाई आजींचा उत्साह पाहून उपस्थित सर्वच जण थक्क झाले. "शरीर साथ देत नसले तरी कर्तव्य महत्त्वाचे आहे," असाच संदेश जणू त्यांनी आपल्या कृतीतून दिला.

आजींच्या या मतदानाची चर्चा संपूर्ण शिरोळ तालुक्यात रंगली असून, निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या उत्साहाचे विशेष कौतुक केले. एका वयोवृद्ध मतदाराने दाखवलेली ही सजगता लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT