मतदार यादीतील साडेचार लाख नावे रद्द 
कोल्हापूर

Kolhapur News : मतदार यादीतील साडेचार लाख नावे रद्द

कोल्हापूर उत्तरमधील सर्वाधिक ८० हजार ५५१ मतदार रडावर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील मतदार यादीतून ४ लाख ४९ हजार ८४ नावे रद्द करण्यात आली. मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) मतदार पडताळणीनंतर ज्यांचे गणना अर्ज आले नाहीत, अशी सर्व नावे मतदार यादीतून रद्द करण्यात आली. यासह २००२ च्या मतदार यादीशी योग्य प्रकारे मॅपिंग न झालेल्या १ लाख २० हजार २४३ आणि विसगंती असलेल्या १ लाख ३६ हजार ३४५ एकूण २ लाख ५६ हजार ५८८ मतदार रडावर आहेत. या मतदारांना नोटीस बजावली जाईल, त्यांची सुनावणी होईल, त्यानंतरच त्यांचे अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघात दि. ३० जून ते दि.१७ ऑगस्ट या कालावधीत एसआयआर प्रक्रियेअंतर्गत मतदारांची पडताळणी झाली. ३ हजार ४५० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी घरोघरी जाऊन मतदारांना गणना अर्जांचे वाटप केले. नंतर हे अर्ज भरून घेण्यात आले. ही सर्व प्रक्रिया सोमवारी रात्री पूर्ण झाली. यानंतर जिल्ह्यातील पडताळणी केलेल्या ३३ लाख ५५ हजार २४४ इतक्या मतदारांपैकी ४ लाख ४९ हजार ८४ मतदारांची नावे रद्द करण्यात आली.

ज्या मतदारांचे २००२ च्या मतदार यादीशी योग्य प्रकारे मॅपिंग झाले नाही, अशी १ लाख २० हजार २४३ आणि मतदार यादीत विविध प्रकारची विसगंती असलेल्या १ लाख ३६ हजार ३४५ एकूण २ लाख ५६ हजार ५८८ मतदारांची नावे ही प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. मात्र, या मतदारांना दि.२४ पासून नोटीस बजावली जाणार आहे. त्यावर त्यांना दि. २३ सप्टेंबरपर्यंत संबधित मतदारसंघातील सहायक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे दाखल करता येतील, हरकती घेता येणार आहेत. या सर्व दाखल हरकतींवर दि. २२ आक्टोबरपर्यंत सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीत जे मतदार आवश्यक ते सर्व पुरावे सादर करतील, त्यांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. ही अंतिम मतदार यादी दि. २७ आक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

रद्द नावांत सर्वाधिक स्थलांतरित मतदार

मतदार यादीतून नावे रद्द केलेल्या ४ लाख ४९ हजार ८४ मतदारांपैकी सर्वाधिक १ लाख ५८ हजार १८२ मतदार कायमचे स्थलांतरित झाले आहेत, तर १ लाख ४२ हजार ६१२ मतदार मयत आहेत. ९७ हजार ८४५ मतदार पडताळणीदरम्यान आढळून आले नाहीत. या पडताळणीत ४८ हजार ८१५ दुबार मतदार आढळून आले. त्यांचीही नावे रद्द झाली, तर १६३० इतर मतदार होते, त्यांची नावे रद्द झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT