कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी गुरुवारी (दि.15) मतदान होत आहे, त्याची मतमोजणी शुक्रवारी (दि.16) सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. शहरातील चार ठिकाणी ही मतमोजणी होणार असून, एका वेळी एकाच प्रभागाची मतमोजणी होईल, ती पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागाची मतमोजणी होणार आहे. 15 टेबलवर मतमोजणी होणार असून, याकरिता एकूण 300 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
एका टेबलवर 1 सुपरवायझर, 1 सहायक आणि 1 शिपाई असे चार मतमोजणीच्या ठिकाणी 300 कर्मचारी असणार आहेत. तसेच, प्रत्येक मतदान केंद्रात प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. एका प्रभागात 25 पासून 30 मतदान केंद्र असणार आहेत. काही प्रभागांत दोन फेऱ्या, तर काही प्रभागांत तीन फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे.
मतमोजणी परिसरातील 14 शाळांना सुट्टी
चार ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी वेळी गर्दी होणार असल्याने या ठिकाणी असणाऱ्या शाळांना सुट्टी देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिल्याची माहिती रविकांत अडसूळ यांनी दिली. यामध्ये गांधी मैदान, दुधाळी, व्ही. टी. पाटील सभागृह येथील मतमोजणी केंद्रांच्या परिसरातील 14 शाळांचा समावेश आहे.
पहिला निकाल तासाभरातच
मतमोजणीला सकाळी 10 वाजता प्रारंभ होईल. स्ट्रॉगरुममधून ईव्हीएम बाहेर काढून मोतमोजणीच्या ठिकाणी आणून नंतर मोजणीला सुरुवात होणार आहे. प्रथम पोस्टल मतदानापासून मोजणी सुरू होणार आहे. सकाळी 11 वाजता पहिला निकाल जाहीर होईल. दुपारी 1 पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल.