kolhapur | कोल्हापुरात वाहनांना प्रवेश कर; ‘पुढारी’तील वृत्ताने सोशल मीडियावर चर्चेला उधाण 
कोल्हापूर

kolhapur | कोल्हापुरात वाहनांना प्रवेश कर; ‘पुढारी’तील वृत्ताने सोशल मीडियावर चर्चेला उधाण

एम. एच. ०९ यूजर फी हॅशटॅग दिवसभर ट्रेंडिंगवर; भन्नाट कमेंट अन्‌ लाईक्सचा पाऊस

पुढारी वृत्तसेवा

सतीश सरीकर

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका हद्दीत प्रवेश करणाऱ्या ‘एमएच ०९’ वगळता इतर सर्व वाहनांवर प्रवेश कर (यूजर फी) आकारण्याच्या ठरावाची बातमी दै. ‘पुढारी’मध्ये शनिवारी (दि. १३) प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर चर्चेचे अक्षरशः उधाण आले. व्हॉटस्ॲ‌प, फेसबुक, इन्स्टाग्रामवर दिवसभर याच विषयाची चर्चा रंगली. काहींनी हा प्रस्ताव शहराच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगत स्वागत केले, तर काहींनी तो ‘तुघलकी कर’ असल्याचे म्हणत विरोध दर्शविला. नेहमीच आपल्या दिलदार आणि पाहुणचार करणाऱ्या स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात या संभाव्य ‘प्रवेश करा’ने मात्र नेटिझन्समध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. एम. एच. ०९ यूजर फी असा हॅशटॅग दिवसभर ट्रेंडिंगवर होता.

इतरत्र चालतो, मग कोल्हापुरात का नाही?​

महापालिकेत १७ जूनला महासभेत या ठरावावर चर्चा होणार असल्याने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. शहरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि नागरी सुविधांवर वाढणारा ताण लक्षात घेता बाहेरून येणाऱ्या वाहनांकडून काही प्रमाणात शुल्क आकारावे, अशा कमेंट अनेकांनी केल्या. “कोल्हापूरच्या रस्त्यांचा वापर परजिल्ह्यातील हजारो वाहने करतात. शहराच्या सुविधांचा लाभ घेतात. मग त्यांच्या देखभालीसाठी काही योगदान देण्यात गैर काय?” असा सवाल सोशल मीडियातून उपस्थित केला. पर्यटनस्थळांप्रमाणे प्रवेश शुल्काची संकल्पना शहरासाठीही राबविण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त केले. काही जणांनी जोतिबा, पन्हाळा, नृसिंहवाडी, महाबळेश्वर, पाचगणी किंवा इतर पर्यटन स्थळांचे दाखले देत, “तिथे चालतो मग कोल्हापुरात का नाही?” अशा कमेंट करत या निर्णयाला ‘गेम चेंजर’ म्हटले.

आर्थिक भार टाकणे योग्य नाही

विरोधकांची संख्यादेखील कमी नव्हती. “कोल्हापूर हे व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि न्यायालयीन कामकाजाचे प्रमुख केंद्र आहे. रोज हजारो नागरिक सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच कर्नाटकातून येथे येतात. त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार टाकणे योग्य नाही,” अशा कमेंट अनेकांनी केल्या. काहींनी ठरावाच्या व्यवहार्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “प्रवेश कर वसूल करण्यासाठी शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवर यंत्रणा उभारावी लागेल. त्याचा खर्च किती? वाहतूक कोंडी वाढणार नाही का?” असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात होते. काही वकिलांनी आणि व्यावसायिकांनी न्यायालयीन कामकाज, व्यवसाय आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे मत व्यक्त केले.

ओन्ली ‘एम. एच. ०९ ’ व्हीआयपी

चर्चेत विनोद आणि मिश्कील प्रतिक्रियांचाही मोठा वाटा होता. “आता कोल्हापुरात येण्यासाठी टोल नाक्याप्रमाणे पास घ्यावा लागणार का?”, “एमएच ०९ असेल तर व्हीआयपी एन्ट्री आणि इतरांना फी?” अशा टोमण्यांनी सोशल मीडिया रंगून गेला.

‘पुढारी’तील बातमीने डिजिटल कट्ट्यावर खिळवून ठेवले

ठराव अद्याप प्राथमिक टप्प्यात असून महासभेची मंजुरी, प्रशासनाचा सविस्तर अहवाल आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया बाकी आहे. मात्र, निर्णय काहीही असो, ‘पुढारी’तील एका बातमीने संपूर्ण शहराला चर्चेचा विषय दिला आणि सोशल मीडियावर कोल्हापूरकरांच्या भावना, अपेक्षा आणि चिंता एकाचवेळी समोर आणल्या. सध्या तरी ‘प्रवेश कर’ लागू होतो की नाही, यापेक्षा त्यावर सुरू झालेली जनतेतील चर्चाच अधिक गाजताना दिसत आहे. ‘पुढारी’तील एका बातमीने कोल्हापूरकरांना डिजिटल कट्ट्यावर खिळवून ठेवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT