वाशी बिरदेवाचा पहिला पालखी सोहळा उत्साहात 
कोल्हापूर

kolhapur News : वाशी बिरदेवाचा पहिला पालखी सोहळा उत्साहात

हजारो भाविकांची उपस्थिती; भंडारा, खारीक, खोबऱ्याची उधळण, हेडाम, भाकणूक

पुढारी वृत्तसेवा

वाशी : बिरदेव, अवघडखानाच्या नावानं चांगभलंचा जयघोष, ढोल-कैताळाचा गजर, भंडारा, खारीक, खोबऱ्याची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत वाशी येथे पहिला पालखी सोहळा उत्साहात झाला. यावेळी भंडारा, खारीक, खोबऱ्याच्या उधळणीत हेडामासह भाकणुकीचे कार्यक्रम झाले.

पहाटे पालखी सोहळा मुख्य मंदिरात आल्यानंतर ‌‘श्रीं‌’ना गादीवर बसवले. विधिवत पूजा-अर्जा, काकड आरती झाली. देवस्थानचे देवऋषी अण्णाप्पा पुजारी यांची कांबळ्यातील भाकणूक झाली. यानंतर कर्नाटकातील भरगुंडे यांच्या मानाच्या बकऱ्याचा बळी देवस्थानचे भिकाजी रानगे यांनी दिला. सुनील पुजारी यांना बकरे धरण्याचा मान मिळाला. आंबील, वडी, भाकरीचा नैवेद प्रसाद रूपाने भाविकांना वाटण्यात आला.

दुपारी तीन वाजता दत्तात्रय पुजारी यांनी पालखीवरील नवसाची मुले उधळली. तर युवराज रानगे यांनी मुले उधळण्यास दिली. पालखी सबीना मंदिरासमोरील सदरेवर आला. यावेळी गडमुडशिंगीचे बाळू बनकर यांच्यासह बनकर बांधवांनी हेडाम खेळले. गडमुडशिंगी देवस्थानचे देवऋषी गणपती पुजारी व वाशी देवस्थानचे देवऋषी भागोजी रानगे यांची भाकणूक झाली. यावेळी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे, हर्षवर्धन साळुंखे, गाव कामगार पाटील मुरलीधर पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य राजू सूर्यवंशी, पंचायत समितीचे सदस्य अमित हजारे, मंडल अधिकारी लक्ष्मीकांत पाटील, तलाठी अनिल कदम, बीट अंमलदार सुभाष कांबळे, रजनीकांत कांबळे, पोलिस पाटील विनायक उलपे उपस्थित होते.

रात्री मंदिर प्रदक्षिणा घालून पालखी सबीना मुख्य मंदिरात आला. यानंतर रात्रभर धनगरी ओव्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रानगे, पुजारी, बनकर, काटकर, हजारे, लांडगे, चिखली व महेकर मानकरी यांच्यासह वाशी ग््राामस्थ, भाविक भक्त उपस्थित होते. मंदिराचा प्रमुख प्रवेशद्वार नगारखान्यावर बिरदेव भक्त सूरज खडके, दिनेश पालकर यांच्याकडून 500 किलो फुलांचा आकर्षक हार अर्पण करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT