कोल्हापूर : मी तुझ्यासाठी काहीही करेन, हे वचन प्रेमात पडलेली प्रत्येक व्यक्ती देते; पण खरोखरच जेव्हा आपल्या जोडीदारासाठी काहीतरी करण्याची वेळ येते तेव्हा कितीजण प्रेमासाठी आपले सर्वस्व देतात, हा प्रश्न उभा राहतो; पण कोल्हापुरातील एका पतीने पत्नीसेवेची तपश्चर्या पूर्ण करत प्रेमातील समर्पणाचा अर्थ उलगडला आहे. गेली 12 वर्षे अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेल्या पत्नीसाठी पती जणू काही तिची आईच बनून सेवाशुश्रूषा करत आहे. स्वाती आणि जितेंद्र सरनोबत यांच्या नात्याची निःस्वार्थ वीण त्यांच्यातील प्रेमाने अधिकच द़ृढ झाली आहे.
14 फेब—ुवारी हा दिवस सर्वत्र प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मनातील प्रेम व्यक्त केले जाते; पण प्रेम हे केवळ भावना शब्दात व्यक्त करण्यापुरते किंवा भेटवस्तू देण्यापुरते सीमित नसून एकमेकांसाठी स्वत्व बहाल करण्याची भावना आहे, याची प्रचिती स्वाती आणि जितेंद्र यांच्या आयुष्यातील गेल्या 12 वर्षांतील एकेक दिवसाने दिली आहे. स्वाती यांना घास भरवण्यापासून त्यांची स्वच्छता करणे, फिजिओथेरपी करून घेणे, त्यांना धरून चालायला लावणे हाच जितेंद्र यांचा गेले एक तप दिनक्रम बनला आहे. अजूनही स्वाती यांची प्रकृती अस्थिर आहे; पण जितेंद्र यांच्या प्रेमाने, मायेने त्यांना आधार मिळाला आहे.
स्वाती या मूळच्या मुंबईतील कल्याणच्या, तर जितेंद्र कोल्हापूरचे. कुटुंबीयांच्या संमतीने ठरवून 1992 ला त्यांचे लग्न झाले आणि त्यानंतर स्वाती कोल्हापुरात आल्या. जितेंद्र आईस्क्रीमचे दुकान चालवत. स्वातीही त्यांना या व्यवसायात मदत करत. दोन मुलांसोबत त्यांचे कुटुंब आनंदात राहत होते. अचानक 2011 मध्ये स्वाती यांना एकदा चक्कर आली आणि त्यातच त्यांना अर्धांगवायू झाला. तेव्हापासून स्वाती या जागच्या उठूही शकत नाहीत, अशी त्यांची अवस्था. दोन्ही मुलं शालेय वयातील. अशा परिस्थितीत जितेंद्र यांनी त्यांचे आइस्क्रीमचे दुकान बंद केले. दुकानगाळे भाड्याने दिले आणि 24 तास त्यांनी स्वाती यांच्या सेवेत झोकून दिले. मुलांचा सांभाळ आणि पत्नी स्वातीची सेवा हेच त्यांचे गेले 12 वर्षे विश्व बनले.
औषधांनी आजार बरा होत होता, तर जितेंद्र यांच्या आधाराच्या शब्दांनी स्वाती यांच्या मनाला उभारी मिळत होती. हा सगळा संघर्ष पुस्तकरूपात यावा, अशी इच्छा स्वाती यांनी जितेंद्र यांना बोलून दाखवली. त्यानंतर स्वाती यांच्या भावना लिहून काढत या दोघांनी ‘ऊर्जा नॉटआऊट...’ हे पुस्तकही लिहिले आहे.
कोल्हापुरात सासर म्हणजे नवरा ऑर्डर सोडणारा असणार, अशी माझी समजूत होती. दुर्दैवाने माझ्या वयाच्या 37 व्या वर्षी मला पॅरालिसीसचा अॅटॅक आला आणि मी परावलंबी बनले. तेव्हापासून पती जितेंद्र एक क्षणही माझ्यापासून दूर गेले नाहीत. एका आईने जशी मुलीची काळजी घ्यावी तसं त्यांनी मला जपले. नवरा नव्हे, तर ते माझी आईच बनले.स्वाती सरनोबत