सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील जनता आणि सिंधुदुर्गसह कोकणातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग रखडल्याने त्याचे बजेट आता तब्बल 6 हजार 300 कोटींवर गेले आहे. सुरुवातीला या प्रकल्पासाठी सुमारे 3 हजार 200 कोटी रुपये खर्च होता. 11 जून 2017 रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कोल्हापुरात या प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले. त्यानंतर प्रत्यक्षात काम पुढे सरकलेच नाही. केवळ कागदोपत्री प्रक्रिया, निविदा, सर्वेक्षण आणि प्रशासकीय अडथळे यांच्यामुळे प्रकल्प रखडला. परिणामी, रेल्वे मार्गाचे बजेट आता दुपटीने वाढले आहे.
2016-17 च्या सुमारास केंद्र शासनाने कोल्हापूर ते वैभववाडी हा नवा रेल्वे मार्ग मंजूर केला होता. या मार्गामुळे कोल्हापूरपासून थेट कोकण आणि गोवादरम्यान रेल्वेने प्रवास करणे सहज शक्य झाले असते. या मार्गाच्या माध्यमातून पर्यटन, व्यापार आणि स्थानिक विकासाला चालना मिळणार असल्याचे ठामपणे सांगितले गेले होते. मात्र, भूमिपूजनानंतर प्रत्यक्षात प्रकल्प आठ वर्षांनंतरही अद्याप सुरू होऊ शकलेला नाही.
रेल्वे प्रशासनाने आणि केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी पुनर्रचना करून सुस्पष्ट टाईमलाईन देणे गरजेचे आहे. तसेच निधी निश्चित करून टप्प्याटप्प्याने काम सुरू करणे आणि राज्य सरकारच्या मदतीने आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे आवश्यक आहे.
2017 मध्ये 3,200 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता; मात्र आता त्याच प्रकल्पाचे बजेट 6,300 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या वाढीमागील प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे सांगितली जात आहेत.
मालमत्ता किमतीत वाढ : शहर आणि ग्रामीण भागात जमिनींच्या किमती वाढल्या असून त्यामुळे भूसंपादनाचा खर्च वाढला आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर साहित्य महागले : स्टील, सिमेंट, डिझेल, मशिनरी आणि कामगारांचा खर्च वाढल्याने एकूण खर्चही वाढला आहे.
नवीन सुरक्षा आणि पर्यावरण नियम : रेल्वे मार्गासाठी अधिक तांत्रिक अटी आणि मानके लागू झाली असून यासाठी अतिरिक्त यंत्रणा व खर्च आवश्यक आहे.
महागाईचा दर : मागील काही वर्षांतील सततची महागाईदेखील बजेटवाढीचा एक मुख्य घटक ठरला आहे.
कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे व्यापारी आणि औद्योगिक केंद्र आहे. वैभववाडी हे कोकणातील एक प्रवेशद्वार आहे. या दोन शहरांना रेल्वे मार्गाने जोडल्यास केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही, तर व्यापार, पर्यटन आणि कृषी क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे. विशेषतः कोकणातील बंदरांशी थेट संपर्क साधता आल्यामुळे कोल्हापूरच्या उद्योगांना मोठा फायदा होणार आहे.