एकनाथ नाईक
कोल्हापूर ः कोवळ्या जीवांवर मातृत्वाचे ओझे पडण्याचे प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यात वाढत आहे. कुमारी मातांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. सीपीआर येथे 2025 मध्ये तब्बल 35 कुमारी माता आढळून आल्या आहेत. 2021 ते 2025 या पाच वर्षात तब्बल 140 कुमारी माता आढळल्या आहेत. शहर आणि ग््राामीण भागात मिळून महिन्याला सरासरी 2 कुमारी माता बाळाला जन्म देत आहेत.
14 ते 17 वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गरीब, मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय सर्वच स्तरातील कुमारी मातांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण, बदलती जीवनशैली, लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि आकर्षणासह अनेक कारणांमुळे कुमारी माता होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग््राामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. प्रसूती होणाऱ्या कुमारी माता साधारण 10 वी, 11 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या मुली अधिक आहेत. यातील अल्पवयीन मुली शारीरिक संबंध आल्यानंतरदेखील आपल्या मासिक पाळीकडे दुर्लक्ष करतात, असे आढळले आहे. गर्भधारणेला 20 आठवडे पूर्ण झाल्यानंतर कायदेशीरदृष्ट्या गर्भपात करता येत नाही. त्यामुळे अनेकवेळा पाचव्या-सहाव्या महिन्यांत पोट दिसू लागल्यानंतर कुमारी माता व पालक देखील जागे होतात; परंतु तेव्हा वेळ गेलेली असते व त्या मुलींची प्रसूती करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहत नाही. यामुळे याबाबत महाविद्यालयीन मुलांमध्ये, पालकांमध्ये आणि समाजामध्ये जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे
सामाजिक प्रश्न अन् वास्तव
अविवाहित मुलींचा गरोदरपणा सामाजिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न झाला आहे. कुमारी मातांची प्रथम कुटुंबाकडून अवहेलना होते. समाज स्वीकारत नाही. पाच-सहा महिन्यांनंतर पोट दिसून लागल्यावर समाजात नाव खराब होईल, मुलीचे करिअर बरबाद होईल, या भीतीमुळे बहुतेक सर्वच स्तरातील कुमारी मातांना प्रसूती होईपर्यंत शहरातील सामाजिक संस्थांमध्ये आश्रय दिला जातो. प्रसूतीनंतर 98 ते 99 टक्के माता प्रसूतीनंतर बाळ सोडून देण्याचाच निर्णय घेतात.
समाजसेवा अधीक्षक विभागाचा आधार
कुमारी मातांना सीपीआरच्या समाजसेवा अधीक्षक विभागाचा मोठा मानसिक आधार मिळत आहे. येथे दाखल झाल्यापासून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा विभाग संबंधित कुमारी मातेला आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देत असतो.
खोटी आमिषे अन् फसवणूक
अनेक मुले मुलींना ‘तशा’ गोष्टीसाठी आमिषे दाखवतात. मैत्रीतून निर्माण झालेली जवळीक ‘त्या’ गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचते. त्यातून अशी घटना घडते. त्याला विरोध केला, तर काही वेळ त्यांना धमकी दिली जाते. त्यातून ‘ती’ गोष्ट घडल्याचे कुमारी मातांनी चौकशीत सांगितले आहे. खोटी आश्वासने, आमिषे, धमकी यातून त्यांची फसवणूक केली जाते.