कवठेगुलंद : कवठेगुलंद सह, शेडशाळ, गणेशवाडी परिसरात गुरुवारी (दि. 19) रोजी अवकाळी पावसाने गारपिटीसह हजेरी लावली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. विजांच्या कडकडाटंसह जोरदार गारांचा पाऊस पडल्याने उन्हाळी पिके धोक्यात आल्याने शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उन्हामुळे नागरिक हैराण होत आहेत, तर अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले की शेतकऱ्यांना पिकांची नुकसान होण्याची धास्ती होती. त्यातच गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटांसह गारा पडू लागल्या. त्यामुळे शेतात कामे करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी पावसामुळे हरभरा, गहू , टोमेटो, वांगी तसेच काही ठिकाणी काढणीला आलेले रब्बी पीक,विजांच्या कडकडाटांसह पावसाची हजेरी मुळे
ज्वारीसह गहू, पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे.
या अवकाळी पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली होती. वादळी वाऱ्यामुळे उशिरापर्यंत विद्युतपुरवठा खंडित झाला होता. जोरदार अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतातील टॉमेटो, वांगी, कांदा, ज्वारी उन्हाळी भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यासह कलिंगड पिकाची हानी झाली आहे.