कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात गुरुवारी धुवाँधार पावसाचा कहर पाहायला मिळाला. या कोसळधारांमुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शुक्रवारी शहरात दिवसभर अधूनमधून कोसळणार्या हलक्या सरी, ढगाळ वातावरण आणि उन्हाचा तडाखा, असे चित्र होते. गेल्या 24 तासांत शहरात 69 मि.मी., तर जिल्ह्यातील 12 तालुक्यांत सरासरी 39.8 मि.मी. पाऊस झाला. हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला शनिवार (दि. 14) पासून मंगळवार (दि. 17) पर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी तर उन्हाचा जोरदार तडाखा जाणवत होता. सायंकाळनंतर जोरदार पाऊस होईल, असे वातावरण निर्माण झाले होते. हवामान विभागाने जिल्ह्याला शुक्रवारी ऑरेंज अलर्ट दिला होता. यामुळे मोठ्या पावसाची शक्यता होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. शहराच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, शुक्रवारी रात्री 9 वाजता पाणी पातळी 13 फूट 5 इंचांवर होती. इचलकरंजी व रुई हे बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात गुरुवारी पन्हाळा व गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली. याशिवाय शिरोळ, शाहूवाडी, करवीर, कागल, तालुक्यांतील काही गावांमध्येदेखील अतिवृष्टी झाली.