दोन लाख दाम्प‍त्यांनी मुलीलाच मानला वंशाचा दिवा 
कोल्हापूर

Kolhapur News : दोन लाख दाम्प‍त्यांनी मुलीलाच मानला वंशाचा दिवा

कोल्हापुरात ‘मुलगीच हवी हो’चा नारा : एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मुलाशिवाय वंश पूर्ण होत नाही, या मानसिकतेची चौकट मोडत कोल्हापूर जिल्ह्यात दोन लाख दाम्प‍त्यांनी एक किंवा दोन मुलींवरच कुटुंब पूर्ण केले आहे. लेकीच्या जन्माचे स्वागत करत, तिचा मान राखत तिला सक्षम करण्यासाठी आई-वडील म्हणून त्यांनी सकारात्मक पाऊल टाकले आहे. स्त्रीभ्रूण हत्या आणि मुलगी नको या प्रवृतीची मळभ समाजमनावरून झटकून टाकण्यासाठी ‘मुलगीच हवी हो’चा नारा कृतीतून देणाऱ्या या दोन लाख दाम्प‍त्यांनी मुलीलाच वंशाचा दिवा मानले आहे.

एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजनाचा निर्णय घेणाऱ्या पालकांमुळे मुलीला जन्म देण्याच्या विचाराला बळ मिळाले आहे. समाजाचा, कुटुंबाचा दबाव झुगारून जन्मापासूनच स्त्रीच्या अस्तित्वाचा जागर केला आहे. मुलगी जन्माला आली म्हणून नाराजी व्यक्त न करता तिला चांगले शिक्षण देऊन घडवण्यासाठी या पालकांनी समाजासमोर आदर्श घालून दिला आहे. गर्भलिंग निदानात स्त्रीभ्रूण असल्याचे समोर आल्यानंतर गर्भपाताच्या घटना वाढत असताना आम्हाला मुलगीच हवी, या निर्णयावर ठाम असलेल्या पालकांचा निर्णय आशेचा किरण ठरला आहे.

दत्तक घेण्यासाठीही मुलीलाच प्राधान्य

बालकल्याण संकुल या संस्थेतून गेल्या ६ वर्षांत २१ अनाथ मुलींना हक्काचे आई-बाबा आणि घर मिळाले आहे. दत्तक प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत आम्हाला मुलगीच दत्तक हवी, अशी मागणी वाढत आहे.

मुलींच्या सुरक्षित भविष्‍यासाठीही योजना

मुलीच्या जन्माचे ओझे वाटू नये, यासाठी ‘लेक लाडकी’, ‘सुकन्या समृद्धी’ यासारख्या योजनांच्या माध्यमातून मुलींचे भविष्य सुरक्षित केले जात आहे. तसेच, शिक्षणासाठी शिष्यवृत्तींचाही आधार मिळत आहे. मुलगी जन्माला यावी, शिकावी आणि सक्षम व्हावी, या उद्देशाला योजनांचे बळ मिळाले आहे.

सध्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मुली सक्षमता दाखवून देत आहेत. यामध्ये एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन करणाऱ्या दाम्प‍त्यांचे योगदान महत्त्‍वाचे आहे. अशा पालकांमुळे समाजात मुलींच्या जन्म दराचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT